दैनिक ‘सनातन प्रभात’मधून हिंदुत्वाविषयी अतिशय स्पष्ट विचार मांडले जातात ! – पू. भास्करगिरि महाराज, मठाधिपती, दत्त देवस्थान

देवगड (जिल्हा नगर) येथील कार्यशाळेत धर्मप्रेमींचा हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिदिन काही घंटे धर्मसेवेसाठी देण्याचा दृढ निश्चय !

हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना उजवीकडे पू. भास्करगिरि महाराज आणि सद्गुरु नंदकुमार जाधव

देवगड (जिल्हा नगर), १ एप्रिल (वार्ता.) – दैनिक ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्रातून हिंदुत्वाविषयी अतिशय स्पष्ट विचार मांडले जातात. त्यातील विचार कुणाला पटतील कि नाही, किंवा त्याचा काय परिणाम होईल याची चिंता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केली नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदूंची केवळ बाजू न मांडता हिंदु धर्मातील आचार, संस्कार, प्रत्येक कृतीमागील शास्त्र यांचे सुरेख लिखाण सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून समाजापुढे मांडले आहे, असे प्रतिपादन नगर जिल्ह्यातील देवगड येथील दत्त देवस्थानचे मठाधिपती पू. भास्करगिरि महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिनांक १२ आणि १३ मार्च या दिवशी नगर जिल्ह्यातील देवगड येथे नगर, संभाजीनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतील धर्मप्रेमींसाठी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

पू. भास्करगिरि महाराज यांचा सन्मान करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या वेळी धर्मप्रेमींनी हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र-जागृती सभा, सामूहिक गुढी उभारणे, रक्षाबंधन, अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील होऊन प्रतिदिन काही घंटे धर्मसेवेसाठी देण्याचा दृढ निश्चय केला.

पू. भास्करगिरि महाराज पुढे म्हणाले की…

१. हिंदूंची मंदिरे ही केवळ दगड, विटा आणि माती यांचे बांधकाम नसून ते एक संस्कार केंद्र आहे, संस्कृती आहे. मंदिरांच्या माध्यमातून हिंदूंची दिव्यता, भव्यता, मंगलता समाजाला अनुभवता येते.

२. मागील ७०० ते ८०० वर्षांपासून भारतावर परकीयांची आक्रमणे झाली. त्यामध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानांची पुष्कळ हानी झाली. सनातन संस्थेच्या कार्याला देवतांचे आशीर्वाद आहेत, तसेच ऋषिमुनींच्या संस्कारांची बळकटी आहे. प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादामुळे सनातनचे कार्य केवळ देशात नाही, तर विदेशातही वाढत आहे.

ग्रंथप्रदर्शनावर ग्रंथ पहातांना पू. भास्करगिरि महाराज आणि डावीकडे श्री. सुनील घनवट

क्षणचित्रे

१. पू. भास्करगिरि महाराजांनी कार्यशाळेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलक प्रदर्शनातील प्रत्येक फलक लक्षपूर्वक वाचला, तसेच श्री. सुनील घनवट यांच्याकडून त्याची माहिती जाणून घेतली. या वेळी महाराजांनी सांगितले की, या फलकांतील तुम्हाला जे योग्य वाटतात ते फलक दत्त मंदिरात लावा.

२. कार्यशाळेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनावरील काही ग्रंथ पू. भास्करगिरि महाराज यांनी खरेदी केले, तसेच भाविकांना वाचनासाठी सर्व ग्रंथांचा एक संच मंदिरासाठी देण्यास सांगितले.

पू. भास्करगिरि महाराज यांना सनातननिर्मित श्री दत्त ग्रंथ भेट देतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

३. कार्यशाळेसाठी संभाजीनगर ग्रामीण भागांतून, तसेच अन्य ठिकाणांहून १०० ते १५० किलोमीटर दूरवरून प्रवास करून काही धर्मप्रेमी कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते.

४. संभाजीनगर येथील ह.भ.प. किशोर महाराज यांना कार्यशाळेसाठी पोचण्यास विलंब झाल्याविषयी खंत व्यक्त केली. कार्यशाळेमध्ये त्यांनी भोजन वाढण्याच्या सेवेपासून अनेक सेवांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.