नागपूर येथील अधिवक्ता सतीश उके यांच्या निवासस्थानी ‘ईडी’ची धाड !

५ घंट्यांच्या चौकशीनंतर भावासह अधिवक्ता उके यांना घेतले कह्यात !

सतीश उके यांच्या निवासस्थानी ‘ईडी’ची धाड

नागपूर – येथील अधिवक्ता सतीश उके यांच्या मानेवाडा येथील निवासस्थानी ३१ मार्च या दिवशी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) धाड टाकण्यात आली. सकाळी ‘ईडी’चे अधिकारी अधिवक्ता सतीश उके यांच्या घरी आले असून घराबाहेर ‘सी.आर्.पी.एफ.’चा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली संपत्ती हडपली आहे, असा आरोप अधिवक्ता उके यांच्यावर आहे. ‘ईडी’ने अधिवक्ता उके यांच्यासह त्यांचा भाऊ प्रदीक उके यांना कह्यात घेतले आहे. याआधी नागपूर गुन्हे शाखेने यापूर्वी या दोघांना चौकशीसाठी कह्यात घेतले होते. उके यांनी यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. ‘जी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात भूमिका मांडेल, त्यावर केंद्रीय यंत्रणा अपवापर करत कारवाई करत आहेत’, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या ‘ईडी’च्या कारवाईनंतर दिली आहे. अधिवक्ता सतीश उके यांचे सहकारी अधिवक्ता वैभव जगताप यांनी उके यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत आहे, असा आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय केले होते आरोप…

अधिवक्ता सतीश उके म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधील एक मोठे गुंड असून ते कुणाहीविरुद्ध काहीही षड्यंत्र रचत असतात. नागपूरमधील मोक्याची ३०० कोटी रुपयांची जागा मिळवण्यासाठी निमगडे यांचा खून करण्यात आलेला होता. निमगडे यांची हत्या झाली, तेव्हा फडणवीस हे गृहमंत्री होते. त्यामुळे कुख्यात गुन्हेगार रणजित सफेलकर यांना फडणवीस यांनी पूर्णपणे संरक्षण दिले होते. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी निवडणुकीतील शपथपत्रामध्ये माहिती लपवल्याचा आरोप करून अधिवक्ता उके यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आरोप

भाजपचे नेते आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे नातेवाईक सुरज तातोडे यांनी ‘बावनकुळे यांनी अनेक कंत्राटदारांकडून कमिशन घेतले आहे’, असा आरोप केला होता. तातोडे हा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कार्यरत होता. अनेक रस्त्यांचे कंत्राटदार आस्थापनांकडून कोट्यवधी रकमेची वसुली आणि त्याचा हिशेब ठेवण्याचे दायित्व त्याच्यावर होते. जवळपास १०० कोटी रुपयांहून अधिक वसुली केली आहे, असा आरोप तातोडे यांनी केला होता. अधिवक्ता सतीश उके यांनी सुरज यांना समवेत घेत पत्रकार परिषदेत या आरोपांचे खुलासे केले होते, तसेच या प्रकरणाची चौकशी करून बावनकुळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी उके यांनी केली होती.