चैत्र शुक्ल प्रतिपदेला नववर्ष साजरे करण्यामागे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत !  – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गुढीपाडवा’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – सध्या पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करतांना सर्वत्र १ जानेवारी या दिवशी नवीन वर्ष साजरे केले जाते. खरे पहाता चैत्र शुक्ल प्रतिपदा हेच हिंदूंचे नववर्ष आहे. ब्रह्मदेवाने याच दिवशी ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि याच दिवसापासून सत्ययुगाला प्रारंभ झाला, तसेच येथूनच हिंदु संस्कृतीची कालगणना चालू झाली. याखेरीज चैत्र शुक्ल प्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अशा प्रकारे चैत्र शुक्ल प्रतिपदेला नववर्षारंभ करण्याचा अर्थात् गुढीपाडवा साजरा करण्यामागे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी एका ‘ऑनलाईन’ प्रवचनामध्ये केले.

पू. नीलेश सिंगबाळ

या वेळी पू. सिंगबाळ यांनी गुढीपाडवा साजरा करण्याची शास्त्रीय पद्धत, ब्रह्मध्वज अर्थात् गुढी कशी उभारावी ? गुढीपूजनाचा विधी आणि सायंकाळी गुढी उतरवून तिचे विसर्जन करण्याची पद्धत इत्यादी माहिती सांगितली. प्रवचनाच्या शेवटी पू. सिंगबाळ यांनी ‘पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे नववर्ष साजरे केल्यामुळे होणार्‍या हानींविषयी विविध माध्यमांद्वारे माहिती सांगून समाजाला जागृत करावे’, असे उपस्थितांना आवाहन केले. या वेळी सर्वांनी नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेलाच साजरे करण्याचा निश्चय केला. या प्रवचनाचा लाभ अनेकांनी घेतला.