हिंदूंना अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळण्याविषयीचा प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे चढ्या आवाजात उत्तर !
|
मुंबई – तुम्ही हिंदु, हिंदु, हिंदु करू नका, धर्माविषयी बोला. त्यामध्ये सगळेच धर्म येतात. तुम्ही त्याला धार्मिक रंग देऊ नका. धर्माच्या संदर्भात एखाद्या राज्यात एखाद्या विशिष्ट धर्माच्या लोकांची संख्या न्यून असेल, मग तो कोणताही धर्म असला, तरी त्यांना अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळाला पाहिजे, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी चढ्या आवाजामध्ये महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना केले. महिला पत्रकाराने त्यांना ‘संबंधित राज्यांमध्ये हिंदू १० टक्के असतील, तर त्यांना अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळाला पाहिजे का ?’, असा प्रश्न विचारला होता.
सर्वोच्च न्यायालयामध्ये अल्पसंख्य घोषित करण्यासंदर्भातील महत्त्वाच्या याचिकेवर केंद्राने भूमिका स्पष्ट करतांना म्हटले, ‘‘राज्य सरकार आपल्या राज्यातील हिंदूंसहित कोणत्याही धार्मिक किंवा भाषिक समुदायाला अल्पसंख्य घोषित करू शकते.’’ या वेळी ‘९ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत’, असेही केंद्राने नमूद केले. या प्रकरणी महिला पत्रकाराने राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि नुकताच नवाब मलिक यांच्याकडील अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारलेले जितेंद्र आव्हाड यांना विचारले, ‘‘देशातील अनेक राज्यांमध्ये हिंदूंची संख्या अल्प आहे. त्यामुळे तेथे हिंदूंना अल्पसंख्य घोषित केले जावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे; मात्र न्यायालयाने सांगितले की, ते राज्याचे अधिकार आहेत.’’ यावर आव्हाड म्हणाले, ‘‘जर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे, तर मी त्यावर का वक्तव्य करावे ? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविषयी बोलण्यासाठी किंवा त्यांचे विश्लेषण करण्यासाठी मी काही अधिवक्ता नाही.