भारत बनणार ‘ग्रीन हायड्रोजन’ निर्यात करणारा देश ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

(पाण्यामध्ये असलेला हायड्रोजन वायू वेगळा काढला जातो. त्याला ‘ग्रीन हायड्रोजन’ असे म्हणतात. तसेच नैसर्गिक वायूमधूनही ‘ग्रीन हायड्रोजन’ काढला जातो. याच्यामुळे प्रदूषण होत नाही.)

डावीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

नवी देहली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ३० मार्च या दिवशी ‘ग्रीन हायड्रोजन’वर चालणार्‍या चारचाकी गाडीतून संसदेत पोचले. या गाडीचे नाव ‘मिराई’ आहे. ‘मिराई’ याचा अर्थ म्हणजे भविष्य. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, ही गाडी लवकरच भारतात येणार असून त्यामुळे देशात मोठी क्रांती होणार आहे. आयात अल्प होईल आणि स्वावलंबी भारताचे आमचे स्वप्न नक्कीच साकार होईल. आत्मनिर्भर होण्यासाठी आम्ही पाण्यापासून सिद्ध होणारा ‘ग्रीन हायड्रोजन’ आणला आहे. ही गाडी प्रयोग आहे. आता देशात ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन प्रारंभ होईल. त्यामुळे आयातीला आळा बसेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. भारत सरकारने ३ सहस्र कोटी रुपयांची योजना चालू केली असून आम्ही ‘ग्रीन हायड्रोजन’ निर्यात करणारा देश बनू. जेथे कोळसा वापरला जाईल तेथे आता ‘ग्रीन हायड्रोजन’ वापरला जाईल.