श्रीलंकेत सिलिंडर मिळवण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून रांगा !

  • रांगेतील सहस्रावधी लोकांपैकी केवळ ३०० लोकांना मिळते सिलिंडर !

  • लाकडांचा वापर करून बनवावा लागत आहे स्वयंपाक !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत गॅस सिलिंडरसाठी पहाटे ४ वाजल्यापासून लोकांना रांगेत उभे रहावे लागत आहे. रांगेतील सहस्रावधी लोकांपैकी केवळ ३०० लोकांना सिलिंडरसाठी कूपन मिळत आहे, अशी व्यथा श्रीलंकेच्या बट्टीकोला परिसरात रहाणार्‍या ३१ वर्षीय शिक्षिका वाणी सुसई यांनी मांडली. श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या तीव्रतेविषयी त्या बोलत होत्या. श्रीलंकेत सध्या इंधनाच्या तुटवड्यामुळे लाकडांचा वापर करून स्वयंपाक बनवावा लागत आहे.

भारनियमनामुळे रुग्णालये बंद करण्याची वेळ !

एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे श्रीलंकेची आर्थिक स्थिती आणखीनच खालावली आहे. सरकारी सेवांवर प्रचंड ताण आला आहे आणि रेल्वे सेवेवरही परिणाम होत आहे. सरकारने लोकांना घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. भारनियमनाच्या समस्येने भीषण रूप धारण केले आहे. रुग्णालये बंद करण्याची वेळ आली आहे; कारण जनित्रांसाठी (जनरेटरसाठी) डिझेल मिळत नाही. विदेशातून साहाय्य मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.