कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे भाजपचा विजय साजरा करणार्‍या मुसलमान तरुणाची त्याच्या धर्मबांधवांकडून हत्या !

  • उत्तरप्रदेशात भाजपचेच सरकार असतांना अशा घटना घडणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
  • याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी पक्ष  आदी राजकीय पक्ष काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
उजवीकडे बाबर

कुशीनगर (उत्तरप्रदेश) – विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍या कठघरही गावातील बाबर या मुसलमान तरुणाला त्याच्याच धर्मबांधवांनी २० मार्च या दिवशी अमानुष मारहाण करत छतावरून खाली फेकले. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने त्याच्यावर लक्ष्मणपुरी येथील रुग्णालयात उपचार चालू असतांना २७ मार्च या दिवशी त्याचा मृत्यू झाला. ‘या प्रकरणाचे अन्वेषण चालू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल’, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी संरक्षण देण्यास दिला होता नकार !

संरक्षण देण्यास नकार देणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक

१० मार्च या दिवशी बाबर विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करत होता. तो येथील गावकर्‍यांना मिठाई वाटत होता. त्यावरून काही मुसलमान अप्रसन्न झाले होते. त्यांनी बाबर यास ‘तू भाजपचा प्रचार का करतोस ?’ अशी विचारणा केली. ‘भाजपचा प्रचार करू नकोस’, असेही त्यांनी बाबरला बजावले. त्यानंतर बाबर यान नेरामकोला पोलीस ठाण्यात जाऊन संरक्षण देण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर २० मार्च या दिवशी त्याच्या धर्मबांधवांनी त्याला मारहाण केली. यात घायाळ झाल्याने त्याला प्रथम जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर लक्ष्मणपुरीमध्ये उपचारांसाठी नेण्यात आले होते.

आरोपींना अटक होईपर्यंत कुटुंबियांकडून अंत्यसंस्कार करण्यास नकार !

बाबरचे कुटुंबीय त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सिद्ध नव्हते. ‘आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही’, अशी भूमिका त्यांनी घेतली; मात्र स्थानिक आमदार पी.एन्. पाठक यांनी त्यांची समजूत काढली आणि ‘आरोपींना कठोर शिक्षा होईल’, असे वचन बाबर याच्या कुटुंबियांना दिले. यानंतर पाठक यांनी बाबरच्या पार्थिवाला खांदा दिला.