श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे परिवार देवतांच्या मंदिरांकडे अक्षम्य दुर्लक्ष ! – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती, श्रीक्षेत्र पंढरपूर

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !

  • हिंदूबहुल देशात देवी-देवतांचा अशा प्रकारे अवमान होणे, हे केवळ भारतातच घडू शकते ! – संपादक
  • मंदिर सरकारीकरणामुळे देवीदेवतांच्या मूर्तीची कशी अयोग्य पद्धतीने काळजी घेतली जाते, ते लक्षात येते. हे टाळण्यासाठी मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करायला हवीत ! – संपादक

एकीकडे श्री विठ्ठल मंदिरात मंदिराची आणि मुख्य गाभार्‍यामध्ये विविध पद्धतीने सजावट करून वाहवा मिळवायची अन् दुसरीकडे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे असणार्‍या परिवार देवतांच्या मूर्तींना रंग देणे, वस्त्र घालणे हे साधे सोपस्कारही पार पाडले जात नाहीत. श्री विठ्ठल-रुक्मिणी यांसह सकल परिवार देवता याही भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या अशा अयोग्य स्थितीतील छायाचित्रांच्या माध्यमातून दुरवस्था आणि दुःस्थिती कशी आहे, ते कळेल. त्यामुळे सरकारीकरण झालेल्या मंदिर समितीचा भोंगळ कारभार सर्वांना कळेल !

१. श्री संतोषीमातेच्या मूर्तीचा रंग निघालेला असणे आणि मूर्तीला वस्त्र परिधान न करणे

एकवीरा मंदिरातील संतोषीमातेच्या मूर्तीला रंग दिलेला नाही, तसेच वस्त्रही परिधान केलेले नाहीत

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अधीन असलेल्या परिवार देवतांमधील एकवीरा मंदिरातील श्री संतोषीमातेच्या मूर्तीचा रंग निघाला आहे. त्यामुळे मूर्तीची प्रसन्न मुद्रा न दिसता भक्तांच्या भावना दुखावल्याप्रमाणे दिसत आहे, तसेच मूर्तीला प्रतिदिन वस्त्र परिधान केले जाते, असे म्हटले जाते; मात्र प्रत्यक्षात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते पहाणीसाठी गेले असता मूर्तीला वस्त्रही परिधान केलेले नव्हते.

२. नवग्रहांची नवीन मूर्ती बसवतांना करण्यात आलेला हलगर्जीपणा !

लादी न बसवता आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आलेली नवग्रहांची मूर्ती

मंदिर समितीच्या अधीन असलेल्या परिवार देवतांमधील काळभैरव मंदिरामध्ये नुकतीच नवग्रहांची मूर्ती नवीन बसवण्यात आली आहे. ही मूर्ती बसवतांना तिच्या खाली लादी (फरशी) बसवण्यात आलेली नाही, तसेच शेजारील भिंतीवरील भगदाडे बुजवण्यात आलेली नाहीत. लादी बसवलेली नसतांनाही आहे त्याच ठिकाणी नवग्रहांच्या मूर्तीची पूजा केली जात आहे. हा भाविकांच्या श्रद्धेचा अपमान आहे.

३. काळभैरव देवतेच्या मंदिराच्या परिसरातील महादेवाच्या शिवपिंडीची दुरवस्था !

शिवपिंडीची झालेली दुरवस्था आणि अस्वच्छता

नामदेव पायरीपासून डाव्या बाजूला काळभैरव देवतेचे मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात प्राचीन काळातील महादेवाची पिंड आहे. या शिवपिंडीकडे दुर्लक्ष झालेले असून तेथे पुष्कळ अस्वच्छता आहे. या मंदिरामध्ये मांजर आणि कुत्रे गाभार्‍यात येऊन पेढे खाणे, शिवपिंडीवर वाहिलेले दूध पिणे, असे अपप्रकार होत असतात. शिवपिंडीवर दूध किंवा पाणी वाहिल्यानंतर ते शाळुंकेतून सहजतेने पुढे जाण्यासाठी सोय केलेली नाही. त्यामुळे ते तेथेच साठून रहाते, तसेच त्याला मुंग्या लागण्याचेही प्रकार होतात.

  • टीप : या पानावरील देवतांची चित्रे प्रसिद्ध करण्यामागे भक्तांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून विडंबन कसे असते, हे समजण्यासाठी प्रसिद्ध करत आहोत.