|
चेन्नई (तमिळनाडू) – जर देवानेही सरकारी भूमीवर अतिक्रमण केले, तर तेही हटवले जाईल, असे विधान मद्रास उच्च न्यायालयाने केले. ‘कोणताही देव ‘सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करून मंदिर बांधा’, असे सांगत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. राज्यातील नमक्क येथे रस्त्यावर असलेल्या अरुलमिघू पलापट्टराई मरिअम्मन तिरुकोइल मंदिराविषयीच्या प्रकरणावरील सुनावणीच्या वेळी न्यायाधीश एस्. आनंद वेंकटेश यांनी वरील विधान केले.
न्यायालयाने म्हटले की,
१. आम्ही अशा ठिकाणी पोचलो आहोत जेथे देवानेही सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केले, तरी न्यायालय ही अतिक्रमणे हटवण्याचा आदेश देईल; कारण सार्वजनिक हित आणि कायद्याचे राज्य सुरक्षित अन् कायम ठेवले पाहिजे.
२. देवाच्या नावावर मंदिरांची उभारणी करून न्यायालयाला धोका देता येणार नाही. काही लोकांची अशी धारणा बनवली आहे की, ते मंदिर बनवून किंवा मूर्ती ठेवून सार्वजनिक ठिकाणी कधीही अतिक्रमण करू शकतात.