‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त केल्याने गोव्यातील काँग्रेसला पोटशूळ !
काँग्रेसने तिच्या कारकीर्दीत काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचा वंशविच्छेद करणार्या आतंकवाद्यांना मोकळे रान दिले. तीच काँग्रेस आता सत्य घटनांवर आधारित काश्मिरी पंडितांवरील चित्रपट करमुक्त केल्यावर थयथयाट करत आहे. हा निर्दयीपणा हिंदूंनी लक्षात ठेवावा !
पणजी, २६ मार्च (वार्ता.) – काश्मीरमधील हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणारा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट गोवा शासनाने करमुक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी गोवा शासनाच्या या निर्णयावर टीका करतांना ‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा शासनाने मागील १० वर्षांत गोमंतकीय चित्रपटांना दिलेल्या आर्थिक साहाय्याचा तपशील घोषित करावा, अशी मागणी केली आहे. अमरनाथ पणजीकर यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा ‘भाजपचा प्रचार करणारा चित्रपट’, असे संबोधून चित्रपटाविषयीचे गांभीर्यच न्यून केले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात होणार्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात किती गोमंतकीय चित्रपट प्रदर्शित झाले ? चित्रपट साहाय्य योजनेखाली शासनाने किती स्थानिक निर्मात्यांना अर्थसाहाय्य दिले ? गोमंतकीय चित्रपट व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले ? या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला द्यावी. (हे प्रश्न ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त केल्यावरून विचारण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वेळीही विचारता आले असते; पण ज्या पक्षाचा अंतच जवळ आला आहे, त्याला हिंदूंना दुखावून असे प्रश्न विचारावे वाटले यात नवल नाही ! – संपादक) ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त करण्यामागे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना काश्मिरी पंडितांविषयी कळवळा नसून सरकारची आर्थिक हानी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उदोउदो करणे आणि चित्रपट निर्मात्याला लाभ करून देणे हा यामागील डाव आहे. भाजपने वर्ष २०१२ म्हणजे सत्तेत आल्यापासून स्थानिक चित्रपटांना अर्थसाहाय्य करण्यास टाळाटाळ केली आहे आणि यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बाहेरच्या चित्रपटांना साहाय्य करण्याचा अधिकार रहात नाही.’’