रशियामध्ये साखरेच्या खरेदीवरून होत आहेत भांडणे !

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे रशियावर घातलेल्या निर्बंधांचा परिणाम !

साखरेच्या खरेदीवरून भांडणे होत असताना

मॉस्को (रशिया) – गेल्या २८ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाचा युक्रेनच्या नागरिकांवर जसा गंभीर परिणाम झाला आहे, तसा आता रशियाच्याही नागरिकांवर काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

१. रशियातील एका व्यापारी संकुलामध्ये काही लोक साखरेसाठी एकमेकांशी भांडू लागले. या भांडणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या युद्धामुळे रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे रशियावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. काही व्यापारी संकुलांमध्ये प्रतिव्यक्ती केवळ १० किलो साखर घेण्याची मर्यादा लावण्यात आली आहे. रशियामध्ये साखरेच्या किमती ३१ टक्क्यांंनी वाढल्या आहेत.

२. रशियाच्या सरकारी अधिकार्‍यांनी सांगितले की, देशात साखरेचा तुटवडा नाही आणि दुकानांमध्ये खरेदी करणार्‍या ग्राहकांमुळे, तसेच साखर कारखानदारांकडून भाव वाढवण्यासाठी साठेबाजी करून ही परिस्थिती निर्माण केली जात आहे. सरकारने देशातून साखरेच्या निर्यातीवरही तात्पुरती बंदी घातली आहे.

३. पाश्‍चात्य देशांच्या निर्बंधांमुळे इतर अनेक उत्पादने महाग होत आहेत. अनेक पाश्‍चिमात्य उद्योगपतींनी रशिया सोडला आहे आणि त्यामुळे चारचाकी गाड्या, घरगुती वस्तू तसेच दूरदर्शनसंच यांसारख्या विदेशी आयात वस्तूंची तीव्र कमतरता आहे.