अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२० मार्च २०२२) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास आपण पहात आहोत. २१ मार्च २०२२ या दिवशीच्या अंकात आपण त्यांचा सनातन संस्थेशी झालेला संपर्क आणि त्यांनी केलेला साधनेला आरंभ हा भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

पू. अशोक पात्रीकर

४. वय ४७ ते ७२ वर्षे

४ ऐ. आईचा मृत्यू झाल्यावर अमरावतीला जाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘टॅक्सी’ पाठवणे आणि तिच्यात माझ्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी आधुनिक वैद्या असलेली एक साधिका अन् एक चालक साधक असणे : ‘मी मिरज येथे असतांना वर्ष २००२ मध्ये माझ्या आईचा मृत्यू झाल्याचे मला दुपारी १२ वाजता समजले. मला ४ बहिणी असल्याने आणि आईला मी एकटाच मुलगा असल्याने मला अमरावती येथे लवकरात लवकर पोचणे आवश्यक होते. तेव्हा मिरजहून अमरावतीला जाणारी एकच गाडी होती आणि तीही दुसर्‍या दिवशी दुपारी अमरावती येथे पोचणार होती. अन्य पर्याय म्हणून मी पंढरपूर येथे जाऊन तेथून थेट अमरावतीला सकाळी ११ वाजता पोचणार्‍या बसने जाण्याचा निर्णय घेतला. मी बसने पंढरपूर येथे दुपारी पोचलो आणि मला ‘तुम्हाला ‘टॅक्सी’ने अमरावतीला जायचे आहे’, असा निरोप मिळाला. थोड्याच वेळात टॅक्सी आली. तिच्यात आधुनिक वैद्या असलेली एक साधिका अन् गाडी चालवू शकणारा एक साधकही होता. ‘मला उच्च रक्तदाबाचा थोडासा त्रास आहे’, हे परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक होते. त्यांनी ‘प्रवासात मला काही त्रास झाल्यास वैद्यकीय साहाय्य मिळावे’, यासाठी आधुनिक वैद्या असलेल्या एका साधिकेला माझ्या समवेत पाठवले होते. परम दयाळू गुरूंनी ही सोय केल्यामुळे मी अमरावती येथे सकाळी ६ वाजता पोचू शकलो.

४ ओ. अमरावती येथील वडिलोपार्जित घराच्या वाटणीतील बहिणींचा रोख रकमेचा वाटा देण्यासाठी आवश्यक रक्कम उपलब्ध होणे : माझ्या आईचा मृत्यू झाला. त्या वेळी घर आईच्या नावावर होते. कायद्याप्रमाणे आईच्या मृत्यूनंतर मालमत्तेचा अधिकार कुटुंबातील सर्व भावंडांना समान मिळतो. आम्ही सर्व भावंडांनी एकत्र बसून ‘रहाते वडिलोपार्जित घर मी ठेवावे आणि चार बहिणींना प्रत्येकी काही रक्कम रोख द्यावी’, असा निर्णय सामोपचाराने घेतला. त्या वेळी माझ्या अधिकोषात नगण्य रक्कम होती. काही दिवसांनी ‘मागील येणे’ म्हणून माझ्या खात्यात आमच्या कार्यालयाच्या वतीने आवश्यक तेवढी रक्कम जमा झाली आणि मी बहिणींचे पैसे सहज देऊ शकलो. ‘त्या माध्यमातून गुरूंनी माझा बहिणींच्या समवेतचा या जन्मीचा देवाण-घेवाण हिशोब पूर्ण केला’, असे मला जाणवले.

४ औ. अमरावती येथील नवीन घर सनातन संस्थेच्या कार्यासाठी अर्पण करणे

४ औ १. बाहेरगावाहून आलेल्या सनातनच्या साधकांना घर भाड्याने देण्याविषयी मित्रांनी विचारल्यावर त्याला नकार देणे : ‘अमरावती येथे माझी आई रहात होती, ते आमचे वडिलोपार्जित घर आणि मी बांधलेले घर’, अशी दोन घरे होती. मी यवतमाळ येथे असतांना अमरावती येथे बांधलेले एक घर रिकामे होते. अमरावतीच्या माझ्या मित्रांनी मला विचारले, ‘‘काही धर्मप्रचारकांना (अध्यात्मप्रसारासाठी बाहेरगावाहून आलेल्या सनातनच्या साधकांना) तुमचे घर भाड्याने देणार का ?’’ त्या वेळी मी त्याला नकार दिला होता. नंतर मी अमरावती येथे स्थानांतर केले आणि साधनेत आलो; पण तोपर्यंत त्या घरासाठी भाडेकरू मिळाले नव्हते. मी आईजवळ आमच्या जुन्या घरातच रहात होतो.

४ औ २. विदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी जागा हवी असतांना नवीन घर गुरूंच्या चरणी अर्पण करण्याचा विचार सर्व कुटुंबियांच्या मनात एकाच वेळी येणे : मी अमरावती येथे आल्यानंतर विदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचे नियोजन चालू होते आणि ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी जागा हवी होती. याविषयी आमच्या घरीच चर्चा चालू होती. त्या वेळी मी अमरावती येथे बांधलेले घर रिकामेच असल्याने आम्ही (मी, माझी पत्नी आणि मुली) केवळ एकमेकांकडे पाहिले. तेव्हा आम्हा सर्वांच्या मनात ‘आपल्या घरीच दैनिक कार्यालय चालू करूया’, हा एकच विचार होता. मी उत्तरदायी साधकांना घराच्या अर्पणाविषयी सांगितले. यावरून लक्षात आले, ‘देवाने कोणतीही चर्चा करून न घेताच आमची मने जुळवली होती. नवीन घर गुरूंच्या चरणी अर्पण व्हायचे होते; म्हणून आतापर्यंत ते रिकामे राहिले होते.’ नंतर संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढत गेल्यावर त्या घराचे सेवाकेंद्रात रूपांतर झाले.

४ अं. आईच्या निधनानंतर कुटुंबियांच्या समवेत अमरावती येथे राहून विविध प्रकारच्या सेवा करणे : माझी आई असेपर्यंत अन्य सर्व जण सेवेसाठी बाहेर गेलो, तरी निखिल (मुलगा) तिच्या समवेत रहात असे. माझ्या आईचे निधन झाल्यानंतर मात्र मी मिरज येथून अमरावती येथे आलो आणि अमरावतीला राहू लागलो. त्या वेळी मी, पत्नी आणि दोन्ही मुली यांच्यापैकी एक जण आळीपाळीने निखिलजवळ थांबायचो अन् बाकीचे सर्व जण बाहेर प्रसाराला जात असत.

वर्ष २००२ ते २००६ या कालावधीत मी अमरावती येथे ‘संगणकीय टंकलेखन, विदर्भ प्रभागाची ग्रंथसाठ्याची सेवा, दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून वार्ता मागवून त्या पाठवणे, नागपूरच्या विधीमंडळात वृत्तसंकलनासाठी जाणे’, अशा आणि मिळेल त्या सेवा करत होतो. वर्ष २००५ मध्ये मला अमरावती जिल्ह्याची अध्यात्मप्रसाराची सेवा मिळाली.

४ क. सेवेसाठी जळगाव येथे जाणे

४ क १. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा करण्यासाठी जळगावला जाणे आणि तेथे दैनिकाच्या संदर्भातील अन् इतरही अनेक सेवा करण्याची संधी मिळणे : त्यानंतर एक वर्षाने दैनिक ‘सनातन प्रभात’ची जळगाव आवृत्ती चालू करण्याचा निर्णय झाला. मला दैनिकाच्या सेवेसाठी जळगाव येथे जाण्याची संधी मिळाली. वर्ष २००६ ते २०१२ या काळात मी जळगाव येथे सेवा केली. दैनिकाच्या संदर्भात सेवा करत असतांना मला साधनेतील पुष्कळ बारकावे शिकायला मिळाले. ‘वार्ताहर, दैनिकाचे मुद्रण (छपाई), वितरण, वसुली, तसेच दैनिकाचे वितरण करणे’ आदी सेवा मी केल्या. काही वेळा प्रतिकूल परिस्थिती असतांनाही देवाच्या कृपेने मला तिच्यावर मात करता आली. त्या काळात मला प्रतिदिन सकाळी अल्पाहार बनवावा लागत असे, तसेच क्वचित् प्रसंगी स्वयंपाकही करावा लागत असे. काही काळासाठी मला अन्य एका साधकाच्या समवेत जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांत प्रसारकार्यही करण्याची संधी मिळाली. त्या वेळी कुणी रामनाथी आश्रमातून आल्यास परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासाठी खाऊ पाठवायचे. त्यांच्याकडून खाऊ मिळेपर्यंत त्यांनी आधी पाठवलेला खाऊ मला पुरत असे.

४ क २. जळगाव येथे जेवणात तिखटाचे प्रमाण अधिक असणे आणि तेथे तिखटाविना पदार्थ खाण्यास आरंभ करणे : जळगावमध्ये तिखट पुष्कळ प्रमाणात खातात. मी जळगावला आल्यावर खाद्यपदार्थात अल्प तिखट घालायला सांगितले, तरी स्वयंपाक करणार्‍या साधिकांच्या हातून पदार्थ तिखट व्हायचे. त्यामुळे मी तिखटाविना पदार्थ खाण्यास आरंभ केला. ते पथ्य मी आताही पाळतो.

४ क ३. परात्पर गुरु देशपांडेकाका यांनी व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होत असल्याची जाणीव करून दिल्यावर प्रयत्नांत वाढ होणे : जळगाव येथे असतांना माझे जप, स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन आणि प्रक्रियेच्या अंतर्गत सारणी लिखाण आणि स्वयंसूचना सत्रे, यांकडे दुर्लक्ष व्हायचे. ‘काय प्रयत्न करावेत ?’, हे मला कळत नव्हते. एकदा परात्पर गुरु देशपांडेकाका जळगाव येथे आले असतांना त्यांनी मला व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प असल्याचे रागावून सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या संकल्पाने माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढू लागले.

४ क ४. एका साधकाने केलेल्या साधनेच्या प्रयत्नांविषयीचा दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख वाचनात येणे आणि त्यात सांगितल्यानुसार प्रार्थना केल्यावर दिवसभरात ८० प्रार्थना होऊन व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ होणे : एकदा मी अमरावती येथे घरी गेलो होतो. तिथे मला दैनिक कार्यालयातून भ्रमणभाष आला की, ‘सनातन प्रभात’च्या मागील अंकातील एक वृत्त शोधून पाठवा. माझ्या घरी येत असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ मी पहात होतो. तेव्हा अकस्मात् गोवा येथील एका साधकाचा ‘त्याने केलेले साधनेचे प्रयत्न’ हा लेख माझ्या वाचनात आला. त्यांनी ‘प्रतिदिन सारणीत २० – २५ चुका लिहिणे, १० – १२ सूचनासत्रे करणे, १०० प्रार्थना आणि १०० कृतज्ञता व्यक्त करणे’, असे ध्येय घेतल्याचे अन् ते पूर्ण करत असल्याचे लिहिले होते. ते श्रीकृष्णाला पुढील प्रार्थना करायचे.

हे श्रीकृष्णा,

१. माझे मन, बुद्धी आणि अहं यांचा लय होऊ दे.

२. माझ्या हृदयात तुझ्याप्रती कृतज्ञता आणि शरणागती यांचा भाव प्रत्येक क्षणी वाढू दे.

३. मला तुझ्या नामजपाचे सतत स्मरण राहू दे.

‘या तीन प्रार्थनांना एक मिनिटही लागत नाही’, असेही त्यांनी लिहिले होते. मला तो एक दैवी संकेत वाटला. मी त्या प्रार्थना कागदावर लिहिल्या आणि करायला आरंभ केला. जळगावला परत गेल्यावर मी भ्रमणभाषवर प्रत्येक १० मिनिटांचा गजर लावून प्रार्थना करायचो. त्यामुळे दिवसभरात माझ्या ५० प्रार्थना व्हायच्या. काही दिवसांनी मी प्रतिदिन १०० प्रार्थना करण्याचे ध्येय घेतले; पण मी ८० प्रार्थना करण्याच्या ध्येयापर्यंतच पोचू शकलो. त्या प्रार्थनांचा परिणाम मला दिसायला लागला. माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढले.

४ क ५. जळगाव येथे असतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

४ क ५ अ. दैनिकाच्या सेवेसाठी जात असतांना अकस्मात् दुचाकी वाहनाने मुसंडी मारणे, एका व्यक्तीने साहाय्य केल्याने पुढील सेवा करता येणे आणि गुरुकृपेने रक्षण झाल्याचे जाणवणे : दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई करण्यापूर्वी दैनिकाच्या चारही पानांचे बटर पडताळणीसाठी प्रतिदिन रात्री ‘गावकरी’ या दैनिकाच्या कार्यालयात पाठवावे लागत असे. एकदा मुसळधार पाऊस पडत होता. मी दुचाकीवरून जात होतो. ‘नेहमीच्या मार्गावर पाणी साचते. त्यामुळे दुचाकी वाहन बंद पडेल’, या भीतीने मी अन्य मार्गाने जात होतो. पावसामुळे मी मार्ग विसरलो आणि माझ्या नकळत दीड फूट खोल नालीवरून माझ्या दुचाकी वाहनाने मुसंडी मारली. मी घाबरलो. बाजूच्या पान-टपरीवर काही माणसे होती. त्यांनी मला पाहिले. त्यांतील एकाने माझे दुचाकी वाहन उभे केले. मी त्याचे आभार मानले आणि दुचाकी वाहनाला ‘किक’ मारून पाहिली, तर ती चालू झाली. मी लगेच ‘गावकरी’ कार्यालयात पोचलो आणि माझी सेवा पूर्ण केली. दुसर्‍या दिवशी पाऊस नसतांना मी आदल्या दिवशीच्या मार्गाने जात असतांना आधीच्या जागेवर पाहिले. तेव्हा मला आश्चर्य वाटले. तिथे रस्ता आणि मी जिथून पडलो, त्या पातळीत १ फूट अंतर होते आणि नंतर नाली होती. त्या अपघातातून केवळ गुरुमाऊलीच्या कृपेने मी वाचलो होतो. मला साधे खरचटलेही नव्हते.

४ क ५ आ. साधकाच्या हातून ८ फूट उंचीवरून एक लादी मांडीवर उभी पडूनही छोटीशी जखम होणे : जळगाव येथील सेवाकेंद्रात मी अंगणात बसलो होतो. तेव्हा काही साधक वरच्या गच्चीवर लाद्या नेत होते. अकस्मात् एका साधकाच्या हातून सुटून एक लादी ८ फूट उंचीवरून माझ्या मांडीवर पडली आणि मांडीला थोडी जखम झाली अन् तिच्यातून रक्त येऊ लागले. सर्व साधक घाबरले. साधकांनी प्रथमोपचार करून मला पट्टी बांधली. एवढ्या उंचीवरून लादी उभी पडूनही मला झालेली जखम नगण्य होती. त्या वेळी सर्वांनी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

४ ख. ‘आतापर्यंतच्या माझ्या सेवांची फलनिष्पत्ती आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, यांमुळे १०.९.२००९ या दिवशी माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.

४ ग. ‘अहं वाढू नये’, याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेली काळजी !

४ ग १. आध्यात्मिक पातळी ६० टक्के होण्यापूर्वी

४ ग १ अ. उत्तरदायी साधकांनी परात्पर गुरुदेवांना कुटुंबाची ओळख करून देतांना ‘यांनी यांचे घर दैनिक कार्यालयासाठी देण्याची सिद्धता दर्शवली आहे’, असे सांगितल्यावर त्यांनी केवळ हसणे आणि तेव्हा ‘त्यांनी कौतुक करावे’, असा विचार मनात असणे : वर्ष १९९९ मध्ये अमरावतीला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी मी आमचे घर अर्पण करण्याविषयी ठरवत होतो. त्याच वर्षी विदर्भातील सर्व साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनासाठी आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी नाशिक येथे बोलावले होते. कुटुंबातील आम्ही सर्व जण गेलो होतो. तिथे व्यासपिठावर परात्पर गुरु डॉक्टर स्थानापन्न झाल्यावर अमरावती येथील उत्तरदायी साधक विदर्भातील सर्व साधकांची ओळख करून देत होते. आमच्या कुटुंबाची ओळख करून देतांना उत्तरदायी साधकांनी सांगितले, ‘‘यांनी यांचे घर दैनिक कार्यालयासाठी देण्याची सिद्धता दर्शवली आहे.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर केवळ हसले. तेव्हा माझ्या मनात ‘त्यांनी आमचे कौतुक करावे’, असा विचार होता.

४ ग १ आ. मुलगी जिल्ह्याची सेवा पहात असतांना तिने सांगितल्याप्रमाणे सेवा करणे : अमरावतीला असतांना कु. तेजल (मुलगी) जिल्ह्याचे दायित्व घेऊन सेवा पहायची आणि मी तिने सांगितल्याप्रमाणे सेवा करायचो. पार्सल आणण्यासारख्या सेवाही देवाने माझ्याकडून करवून घेतल्या.

४ ग २. आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर

४ ग २ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखात कुठेही आध्यात्मिक पातळी लिहिली न जाणे आणि तेव्हा ‘आपली पातळी मथळ्यात यायला हवी’, असा अहंयुक्त विचार मनात येणे : माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यावर मी लिहिलेले काही लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेल्या अन्य साधकांच्या लेखांच्या मथळ्यात त्यांची आध्यात्मिक पातळी प्रसिद्ध केली जात असे. माझ्या लेखाच्या मथळ्यात किंवा लेखात अन्य कुठेही माझी आध्यात्मिक पातळी लिहिली जात नसे. तेव्हा ‘माझीही आध्यात्मिक पातळी मथळ्यात यायला हवी’, असा अहंयुक्त विचार माझ्या मनात येत असे.

४ ग २ आ. जिल्ह्याचे दायित्व पहाणारे सर्व साधक अल्प पातळीचे असणे आणि त्यांच्याशी जुळवून घेण्ो : मी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे दायित्व पहायला आलेले सर्व साधक माझ्याहून अल्प पातळीचे होते. ते आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घ्यायचे. त्या वेळी सुदैवाने त्यांच्याशी जुळवून घ्यायला शिकवले.

४ घ. अहं वाढल्याने आध्यात्मिक पातळी तेवढीच राहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करणे : माझ्या आजपर्यंतच्या साधनेतील मोठा कालावधी मी जळगाव येथे व्यतीत केला. मी तिथे असेपर्यंत माझी आध्यात्मिक पातळी ६४ टक्के झाली. माझ्यातील अहं वाढल्याने आणि माझ्याकडून झालेल्या समष्टी चुकांमुळे वर्ष २०११ मध्ये माझी पातळी तेवढीच राहिली.

१. सद्गुरु राजेंद्र शिंदे जळगाव येथे आले असतांना त्यांनी माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची मला कठोर शब्दांत जाणीव करून दिली.

२. नंतर सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी मला माझ्यात कृतज्ञताभाव अल्प असल्याची जाणीव करून दिली आणि प्रत्येक नामजपानंतर ‘कृतज्ञता’ या शब्दाचा जप करायला सांगितला.

या संतद्वयींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देवाने माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले.

३. त्यानंतर मी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘मी काय करावे ?’, असे विचारले असता त्यांनी मला ‘व्यष्टी साधनेसाठी भाव आणि समष्टी साधनेसाठी प्रेमभाव’ हा कानमंत्र दिला. त्यानंतर त्यांच्या कृपेने माझ्याकडून तसे प्रयत्न झाले.

४ च. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे दुःखद घटनांतही स्थिर रहाता येणे

४ च १. आईच्या मृत्यूच्या वेळी पुष्कळ दुःख न होणे : वर्ष २००२ मध्ये अमरावती येथे माझ्या आईचे निधन झाल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी मी मिरजहून अमरावतीला पोचलो; पण मला तिच्या मृत्यूचे पुष्कळ दुःख झाले नाही.

४ च २. बहिणीच्या अंत्यसंस्कारापर्यंत पोचता येणे शक्य नसल्याचे लक्षात येणे आणि संतांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर रात्री तेथे जायला निघणे : जळगाव येथे सेवेला असतांना वर्ष २०१० मध्ये माझ्या दुसर्‍या क्रमांकाच्या पुणे येथे रहात असलेल्या बहिणीचे निधन झाल्याचे माझ्या लहान बहिणीने मला दुपारी कळवले. त्याच दिवशी परात्पर गुरु देशपांडेकाका आणि सद्गुरु सत्यवानदादा यांचे साधकांसाठी मार्गदर्शन होते. मी विचार केला, ‘बहिणीच्या अंत्यसंस्कारापर्यंत मला पोचणे शक्य नाही.’ तेव्हा मी संतांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर रात्री निघण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे रात्री निघून सकाळी पुणे येथे पोचलो.

४ च ३. मोठ्या बहिणीचे निधन झाल्यावर हिंदु राष्ट्र-जागृती सभेशी निगडित सर्व सेवा आटोपून तिसर्‍या दिवशी अस्थि आणि राख सावडायला (गोळा करायला) जाणे : वर्ष २०१९ मध्ये पुसद (जिल्हा यवतमाळ) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्यावर रात्री आम्ही साधक यवतमाळ येथे चारचाकी वाहनाने जायला निघालो. प्रवासात असतांना नागपूरच्या बहिणीच्या मुलाचा भ्रमणध्वनी आला, ‘‘आईचे (माझ्या मोठी बहिणीचे) निधन झाले. तिच्यावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करणार आहेत.’’ मी सभेशी निगडित सर्व सेवा आटोपून नागपूरला तिसर्‍या दिवशी अस्थि आणि राख सावडायला (गोळा करायला) गेलो.

४ च ४. साधनेत आल्यानंतर शारीरिक विकार आपोआप न्यून होणे : साधनेत येण्यापूर्वी माझी प्रकृती अतिशय नाजूक होती. सर्दी, पडसे, ताप, जुलाब, असे विकार वर्षभर चालू रहायचे. साधनेत आल्यानंतर माझे हे विकार आपोआप न्यून झाले.

४ छ. ‘आध्यात्मिक पातळी ६४ टक्के ते संतपद’ हा प्रवास !

१. ‘फेब्रुवारी २०१२ मध्ये मी देवद (पनवेल) येथील आश्रमात सेवेसाठी गेलो. तिथे मी ग्रंथांच्या संबंधित संकलनाची सेवा केली. त्या वर्षी माझी आध्यात्मिक पातळी ६६ टक्के झाली.

२. ऑक्टोबर २०१२ पासून मी रामनाथी आश्रमात ग्रंथांशी संबंधित सेवा करत होतो. वर्ष २०१३ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६७ टक्के झाली.

३. ‘परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, संतांचे आशीर्वाद आणि साधकांची प्रीती’, यांमुळे १०.५.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी मी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले. तेव्हापासून ऑक्टोबर २०१७ पर्यंत मी रामनाथी आश्रमात सेवारत होतो.

४ ज. वर्तमानकाळात रहायला शिकवणारी गुरुमाऊली ! : माझ्या साधनाप्रवासाच्या आरंभीच्या टप्प्यात मी परात्पर गुरु डॉक्टरांपासून (गोव्यापासून) १ सहस्र ६०० कि.मी. दूर अमरावती येथे होतो. नंतर मी जळगाव येथे सेवा करू लागलो. तेव्हा ते अंतर ३०० कि.मी. झाले. नंतर मी देवद आश्रमात सेवा करायला लागल्यावर ते अंतर ७०० कि.मी. न्यून झाले आणि ऑक्टोबर २०१२ पासून मी गोवा येथे सेवा करायला लागल्यावर ते अंतर (मी सेवा करत असलेल्या ठिकाणापासून परात्पर गुरु डॉक्टरांची खोली यांतील अंतर) केवळ ७ मीटर होते. ‘त्यांनी मला एवढ्या समीप आणून नंतर पुन्हा अमरावतीला १ सहस्र ६०० कि.मी. दूर सेवेला पाठवून मला वर्तमानकाळात रहायला शिकवले’, असे मला जाणवले.

४ झ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘तुमची निर्गुण रूपाची साधना आहे’, या बोलाची आलेली प्रचीती ! : आजपर्यंत माझी पात्रता नसतांनाही गुरुमाऊलीने मला सर्वकाही दिले. एकदा मी गुरुमाऊलींना विचारले, ‘‘मला स्वप्नात कधी तुमचे किंवा देवतांचे दर्शन होत नाही. मला नामजप करतांना काही अनुभूती येत नाहीत.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमची निर्गुण रूपाची साधना आहे.’’ नंतर मला पुढील दोन प्रसंग आठवले.

४ झ १. तिरुपति बालाजीच्या दर्शनासाठी गेल्यावर अंधार असल्याने मूर्तीच्या समोरून जाऊनही दर्शन न होणे आणि त्याचे काही न वाटणे : आम्ही एकदा साधनेत नसतांना तिरुपति येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेलो होतो. गर्दी असल्याने आणि मंदिरात सर्वत्र अंधार असल्याने बालाजीच्या मूर्तीसमोरून जातांनाही मी दर्शन न घेताच पुढे गेलो. मला हे कळलेही नाही. नंतर पत्नीने मला विचारले, ‘‘दर्शन झाले का ?’’ तेव्हा मी तिला ‘नाही’ म्हणालो. त्यावर तिने सांगितले, ‘‘आपण पुढे आलो आणि मूर्ती तर मागे राहिली.’’ गर्दी असल्याने मंदिरातील स्वयंसेवक भाविकांना पुढे ढकलत होते. त्यामुळे आता दर्शनासाठी परत मागे फिरणे अशक्य होते; पण मला त्याचे काहीच वाटले नाही.

४ झ २. हनुमान जयंतीच्या दिवशी हितचिंतकाने भाविकांना ‘हनुमानचालीसा’ छापलेला कागद पाकिटात घालून देणे; मात्र स्वतःला दिलेले पाकीट रिकामे आढळणे : दुसर्‍या प्रसंगात जळगाव येथे असतांना एका हितचिंतकाने मला हनुमान जयंतीला बोलावले होते. ते आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ‘हनुमानचालीसा’ छापलेला एक कागद खिशात मावेल, एवढ्या आकाराच्या पाकिटात घालून देत होते. त्यांनी मला दिलेले पाकीट मी उघडून पाहिल्यावर त्यात काहीच नसल्याचे मला आढळले.

४ ट. सध्या करत असलेली सेवा : सध्या मी विदर्भातील आणि छत्तीसगड या राज्यात प्रसारसेवा करत आहे. परात्पर गुरु डॉक्टर या धावपळीच्या सेवेतही प्रत्येक क्षणी माझी काळजी घेत आहेत.

५. कुटुंबीय आणि साधक यांनी साधनेत केलेल्या साहाय्याबद्दल त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

या साधनाप्रवासात मला जे काही मिळाले, ते केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मिळाले. या वाटचालीत मला माझी पत्नी सौ. शुभांगी, कन्या कु. तेजल (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सौ. अनघा जोशी ((पूर्वाश्रमीची कु. मीनल) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)) अन् मुलगा श्री. निखिल यांचे अनमोल साहाय्य मिळाले. आवश्यक वाटल्यास मी अजूनही साधनेत त्यांचे साहाय्य घेतो. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझे जावई श्री. शशांक जोशी देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत, तसेच माझी सून (निखिलची पत्नी) सौ. नमिता निखिल पात्रीकर आणि आणि तिचे आई-वडील (सौ. जयश्री अशोक सारंगधर आणि श्री. अशोक सारंगधर) पूर्णवेळ साधक आहेत.

मी जिथे सेवेला होतो, त्या ठिकाणच्या साधकांनीही मला साधनेत साहाय्य केले. त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञ आहे.

६. गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

परात्पर गुरु डॉक्टरांनी एका रजोगुणी आणि मायेत पूर्णपणे गुंतलेल्या अभियंत्याला त्याच्या वयाच्या ४७ व्या वर्षी साधनेत आणले आणि तेव्हापासून ते माझे बोट धरून मला चालवत आहेत. त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्प आहे. ‘संतपद मिळाल्यावर माझे आत्मिक बळ पुष्कळ वाढले आहे’, असे मला जाणवते.

‘या देहाचा अंतही गुरुमाऊलींच्या चरणांशी व्हावा’, हेच त्यांच्या चरणी मागणे आहे. गुरुमाऊलीने सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणांवर कृतज्ञताभावाने समर्पित करतो.’

(समाप्त)

– (पू.) अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०२१)

प्रार्थना आमची गुरुचरणी

२० मार्च २०२२ या दिवशी पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी अर्पण केलेले काव्यपुष्प येथे देत आहोत.

लाभले संत कुळाचे भाग्य आम्हा ।
साधनेच्या वाटेवरी पुढे नेतसे पू. बाबा आम्हा (टीप) ।। १ ।।

संसारातून साधनेच्या प्रगतीचा पाठ पढवला त्यांनी ।
केवढी ही गुरुकृपा आम्हा कुटुंबियांवरी ।। २ ।।

साधनामार्गात अडचणी आल्या जरी कुठे, कुठे ठेच लागे ।
त्याच क्षणी पू. बाबा रहाती पाठीशी खंबीरपणे उभे ।। ३ ।।

सतत वर्तमानात राहून देत असे बोधामृत ।
हे तर आहे आमचे बहुत सुकृत ।। ४ ।।

निर्मळता आणि कृतज्ञताभाव सतत वसे त्यांच्या मनी ।
गुरुदेवा, असेच प्रयत्न आम्हाकडून करून घ्यावे, येण्या आपल्या चरणी ।। ५ ।।

वाट पहातो आपल्या सद्गुरु पदाची ।
गुरुदेवही लवकरच पूर्ण करतील प्रार्थना आमची ।। ६ ।।

टीप : पू. बाबा म्हणजे पू. अशोक पात्रीकर

– पात्रीकर कुटुंबीय

या लेखाचा मागील भाग पुढील लिंक वर पहा : https://sanatanprabhat.org/marathi/562567.html

 येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक