संपर्क असावा, संसर्ग नको !

श्री. विद्याधरपंत नारगोलकर

‘स्वच्छतेच्या विकासाचा एक परिणाम सांगितला आहे की, दुसर्‍याशी संपर्क कायम रहावा; परंतु संसर्ग असू नये. संस्कृत शब्दांचा सूक्ष्म अर्थ लक्षात आला नाही, तर ते शब्द तुमच्याशी बोलत नाहीत. दुसर्‍यांशी संपर्क असावा, संसर्ग नसावा म्हणजेच संपर्क आक्रमक शारीरिक पीडा देणारा नसावा.

आपल्याकडे एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करण्याची प्रथा आहे. पश्चिमेकडे हस्तांदोलन करतात. आपल्या योजनेत संसर्ग नाही, तर संपर्क आहे. ते लोक फुलांचा गुच्छ बनवून हातात देतात. गुच्छात फुलांना स्वातंत्र्य नसते. सगळी फुले एकत्र बांधलेली असतात. आपल्याकडे हार घालण्याची प्रथा आहे. त्यात प्रत्येक फूल वेगवेगळे असते. प्रत्येक फूल स्वतंत्र असते. गुच्छात संसर्ग आहे; मात्र संपर्क नाही आणि हारात संपर्क आहे; मात्र संसर्ग नाही. हाराचा दोरा फुलांना जोडतो; म्हणून संपर्क असतो. हार आपल्या सभ्यतेचे प्रतीक आहे.

कर्माच्या दुधाने, भक्तीच्या साखरेने आणि ज्ञानाच्या केशराने बनवलेले श्रीखंड म्हणजे गीताखंड ! त्याचप्रमाणे राष्ट्राच्या प्रेरणेने, दुर्दम्य आशावादाच्या साखरेने, इतिहासाच्या भगव्या केशराने राष्ट्रवादी व्यक्तीच्या अंतःकरणात स्थिर झालेले सत्त्व म्हणजे हिंदुत्व ! एकवेळ मी हळूहळू चालेन; पण एकदाही माघारी फिरणार नाही. सरस्वतीच्या साधकाने कधीही आपला आचार सोडू नये आणि लाचार होऊ नये.’

– श्री. विद्याधरपंत नारगोलकर, पुणे