घरच्या घरी कोथिंबीर आणि पुदिना यांची लागवड

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

१. कोथिंबीर

१ अ. धने पेरण्याच्या विविध पद्धती : ‘कोथिंबीर ही बियांपासून होत असली, तरी या बिया आपल्याला कुठल्याही रोपवाटिकेतून विकत आणण्याची आवश्यकता नसते. आपल्या स्वयंपाकघरातच त्या बिया असतात. कोथिंबिरीचे बी म्हणजे ‘धने’. हे धने पेरण्याच्या विविध पद्धती आहेत. कुणी ते चपलेने किंवा लाटण्याने रगडून दोन भाग करून पेरतात, तर कुणी अख्खेच पेरतात. कुणी फोडलेले किंवा अख्खे धने १० ते १२ घंटे पाण्यात भिजवून मग पेरतात, तर कुणी कोरडेच पेरतात. ज्याला ज्या पद्धतीत यश मिळते, तीच त्याच्यासाठी योग्य पद्धत, म्हणजेच ‘यासाठी एकच अशी पद्धत योग्य’, असे काही नाही; पण सर्वसाधारणपणे धने हलकेच रगडून त्याचे दोन भाग करूनच ते पेरले जातात. केवळ रगडतांना जास्त जोर लावून बियांची हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी.

१ आ. कोथिंबीर लागवड : कोथिंबिरीची मुळे मातीत फारशी खोल जात नाहीत. त्यामुळे ६ इंच खोलीची कुंडी किंवा खोका, जे काही असेल, ते चालते. ज्यात तुम्ही कोथिंबीर लावणार आहात, त्याला अधिकचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य ती सोय करून घ्यावी. वरून २ ते अडीच इंच जागा सोडून कुंडी ‘पॉटींग मिक्स’ने (सेंद्रिय खत घातलेल्या मातीने) भरून घ्यावी. (टीप) कुंडी भरून झाल्यावर थोडे पाणी वाहून जाईपर्यंत सगळी माती ओली करून घ्यावी. ही कुंडी १ दिवस तशीच ठेवावी. दुसर्‍या दिवशी काळजीपूर्वक दोन भाग केलेले धने समतल केलेल्या पृष्ठभागावर व्यवस्थित पसरून घ्यावेत. ओळी करायच्या असतील, तर ओळींमध्ये किंवा सर्व कुंडीभर, जसे हवे तसे धने पसरून घ्यावेत. त्यावर अर्धा ते पाऊण इंच पॉटींग मिक्सचा थर देऊन सर्व धने झाकून घ्यावेत. शक्यतो झारीने पाणी द्यावे. धन्यांवरची माती हालून ते उघडे पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. माती कायम ओलसर राहील, याची काळजी घ्यावी. माती कोरडी वाटली, तरच पाणी द्यावे. तेही झारीनेच. धने रुजून कोंब बाहेर येण्यास वेळ लागतो. कधी कधी १५ ते २० दिवसही लागतात. तेव्हा धीराने घ्यावे. या काळात माती केवळ ओलसर ठेवायची आहे. पाणी जास्त होणार नाही, हे पहावे.

(टीप – ‘पॉटींग मिक्स’ऐवजी नैसर्गिक पद्धतीने जीवामृत वापरून पालापाचोळा कुजवून बनवलेले ह्यूमसही (सुपीक मातीही) वापरता येते. – संकलक)

श्री. राजन लोहगांवकर

१ इ. पावसाळ्यात लागवड करतांना लक्षात ठेवायची सूत्रे : पाऊस जास्त असलेल्या काळात धने रुजून यायला वेळ लागतो. या काळात सूर्याचे दर्शनही होत नाही आणि वाराही जास्त असतो. त्यामुळे रोपे रुजून आलीच, तर आडवी पडतात. त्यामुळे पावसाळ्यात कोथिंबीर लागवडीचा प्रयत्न करायला आडकाठी नाही; पण अपयश आलेच, तर हिरमोड होऊ देऊ नये आणि हवामान पालटताच किंवा पाऊस न्यून होताच पुन्हा प्रयत्न करावेत.

१ ई. लागवडीनंतरचे व्यवस्थापन : कोंब रुजून आले की, नियमित पाणी द्यावे. ‘पॉटींग मिक्स’मध्ये जेवढे खत घातले आहे, तेवढे खत पुरेसे होते; पण वाटलेच, तर ‘कंपोस्ट टी (एक प्रकारचे सेंद्रिय खत)’, जीवामृत इत्यादी जे काही शक्य आहे, ते शक्यतो द्रव स्वरूपात द्यावे. शेण किंवा शेणाची ‘स्लरी (पातळ काला)’ नको. कोंब रुजून वर आल्यावर ३ – ४ आठवड्यांत कुंडी चांगली भरून येईल. प्रतिदिन पाहिजे तेवढी कोथिंबीर खुडून घ्यावी. नवीन फुटवे येत रहातील. असे ३ – ४ वेळा झाल्यानंतर फुले येऊ लागतील. फुले येत आहेत, म्हणजे रोपांचे नियत कार्य पूर्ण होण्याची वेळ आली, असे समजायला आडकाठी नाही. नंतर हवे असल्यास रोपांना आपला जीवनकाळ पूर्ण करू द्यावा. फुलांपासूनच फळे, म्हणजेच धने सिद्ध होतील. पूर्ण सिद्ध झालेले धने थोडे पुढील लागवडीसाठी ठेवून बाकीचे स्वयंपाकघरात प्रतिदिनच्या वापरासाठी ठेवू शकतो. नंतर सगळी रोपे काढून कंपोस्टमध्ये टाकावीत. माती व्यवस्थित मोकळी करून घ्यावी. २ – ३ दिवस तशीच उघडी ठेवून मगच वापरायला घ्यावी; मात्र पुन्हा याच मातीत कोथिंबीर लावणे टाळावे. कोथिंबिरीवर फारशी कीड पडत नाही. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी इत्यादी काही करावे लागत नाही.

२. पुदिना

२ अ. सर्वांत सोपी असलेली पुदिन्याची लागवड : पुदिन्यासारखे सोपे पीक नाही. कुंडीमध्ये हे पीक घेणे अतिशय सोपे. मी तर म्हणेन की, हे काम घरातल्या लहान मुलांना द्यावे. त्यामुळे त्यांच्यामध्ये बागकामाची आवडही निर्माण होईल. पुदीना लागवडीत यश मिळण्याची शक्यता ९९ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. याचे परिणाम ८ ते १० दिवसांतच दिसू लागतात.

२ आ. लागवडीसाठी योग्य काड्या निवडणे : पुदिन्याच्या बिया रोपवाटिकेमध्ये मिळत असल्या, तरी त्या विकत घेण्याची काहीच आवश्यकता नाही. बाजारातून जेव्हा आपण पुदिन्याची जुडी आणतो, तेव्हा त्यातीलच बॉलपेनमधील रिफिलच्या जाडीएवढ्या काडीच्या किंवा उदबत्तीच्या जाडीएवढ्या मातकट रंगाच्या काड्या वेगळ्या काढून ठेवाव्यात. त्यांवरील मोठी पाने काढून घ्यावीत. अशा काड्यांवर सहसा खालच्या बाजूची पाने निबर झालेली असतात. क्वचित् प्रसंगी कीड पडल्यामुळे पानांवर छिद्रेही असतात. अशी पाने काढून टाकावीत. शेंड्याकडची लहान पाने काड्यांवर तशीच ठेवावीत.

२ इ. पुदिना लागवडीचे २ पर्याय : आता दोन पर्याय आपल्यापुढे असतील. एक तर या काड्या पेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये ठेवून थेट ऊन मिळणार नाही; पण सूर्यप्रकाश मिळेल, अशा ठिकाणी ठेवाव्यात. एक दिवसाआड पाणी पालटावे. काड्यांना शक्यतो धक्का न लागू देता, म्हणजे काड्यांची मोळी हातात धरून पेला आडवा करून पाणी ओतून द्यावे आणि हलक्या हाताने पेल्यामध्ये पुन्हा पाणी घालावे. ५ – ६ दिवसांत काड्यांच्या टोकांना इवलीशी पाने दिसू लागतील आणि पेल्यामधल्या टोकांवर लहान पांढरी मुळे दिसू लागतील. ही लहान रोपे कुंडीत लावावीत. दुसरा पर्याय म्हणजे निवडून बाजूला केलेल्या काड्या थेट मातीत खोचाव्यात. उरलेले काम काड्या आणि माती एकमेकांच्या साहाय्याने करतील.

२ ई. कुंडीचा योग्य आकार : पुदिन्याच्या रोपांची मुळे फार खोल जात नाहीत. त्यामुळे साधारण ६ इंच खोल कुंडी पुष्कळ होते. पुदिना पावसाळ्यात अंगणात उगवणार्‍या गवतासारखा आडवा पसरत असल्यामुळे कुंडीचा व्यास मोठा असलेला कधीही चांगला. त्यामुळे कुंडीऐवजी पसरट टब इत्यादी घेणे श्रेयस्कर ठरते.

२ उ. कुंडीत काडी खोचण्याची पद्धत : कुंडी नेहमीप्रमाणे ‘पॉटींग मिक्स’ने भरून व्यवस्थित ओली करून घ्यावी. त्यामध्ये मुळे फुटलेल्या काड्या किंवा दुसरा पर्याय निवडणार असाल, तर काड्या बोटाने खड्डा करून त्यात खोचाव्यात. पालवी अधिक आणि लवकर फुटण्यासाठी मातीच्या पातळीला ४५ अंशांच्या कोनात तिरक्या खोचाव्यात. अशा वेळी काडीचा अर्धा भाग मातीत जाऊ द्यावा. असे केल्याने जास्त मुळे फुटून अधिक पाने फुटतील आणि पर्यायाने पुदिना अधिक प्रमाणात मिळेल.

२ ऊ. पाणी आणि इतर व्यवस्थापन : माती कोरडी वाटली की, ‘स्प्रे’ने पाणी देत रहावे. साधारण १ ते सव्वा मासात कुंडी भरून जाईल. आपल्या आवश्यकतेप्रमाणे पुदिन्याची पाने खुडून घ्यावीत. चालत असल्यास वरचे शेंडेही कापून घ्यावेत. तसे केल्यास नवनवीन फुटवे येत रहातील.’

– श्री. राजन लोहगांवकर, टिटवाळा

कोथिंबीर आणि पुदीना लागवडीचे प्रात्यक्षिक सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध !

कोथिंबीर आणि पुदीना लागवडीचे प्रात्यक्षिक सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यासाठी बाजूला दिलेला ‘क्यू आर् कोड’ (QR Code) स्कॅन करावा.

क्यू आर् कोड (QR Code) म्हणजे काय ?

‘QR कोड’ म्हणजे ‘Quick Response कोड’. आजकाल सर्वच ‘स्मार्ट फोन्स’मध्ये ‘QR कोड स्कॅनर’ ही प्रणाली (ॲप) उपलब्ध असते. (नसल्यास ती ‘डाऊनलोड’ करता येते.) ही प्रणाली चालू करून ‘QR कोड’वर ‘स्मार्ट फोन’चा छायाचित्रक (कॅमेरा) धरावा, म्हणजे ‘कोड’ ‘स्कॅन’ होतो आणि संकेतस्थळाची मार्गिका आपोआप उघडते.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

साधकांना लागवड करतांना आलेले अनुभव, लागवडीसंबंधी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग यांविषयीचे लिखाण स्वतःच्या छायाचित्रासहित पुढील पत्त्यावर पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संगणकीय पत्ता : [email protected]

आपत्काळाच्या दृष्टीने मातीच्या कुंड्यांपेक्षा अन्य पर्याय वापरणे अधिक चांगले

श्री. माधव पराडकर

‘मातीच्या कुंड्यांमध्ये झाडे लावणे’ हे झाडांच्या वाढीच्या दृष्टीने आदर्श आहे; परंतु मातीच्या कुंड्या हाताळतांना फुटू शकतात. आपत्काळामध्ये काय होईल, याची शाश्वती नसल्याने कुंड्या फुटून होणारी हानी टाळण्यासाठी या काळात मातीच्या कुंड्यांपेक्षा पत्र्याची पिंपे, तेल भरून येणारे पत्र्याचे डबे, प्लास्टिकच्या गोण्या, पिशव्या, डबे किंवा पिंपे आदी पर्यायी साधनांचा वापर करणे अधिक चांगले. या पर्यायी साधनांमधून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी त्यांच्या तळापासून अर्धा इंच उंचीवर २ – ३ छिद्रे ठेवावीत. तळावर छिद्रे ठेवल्यास झाडांची मुळे जमिनीत जाण्याची शक्यता अधिक असते; म्हणून तळावर छिद्रे ठेवू नयेत.’

– श्री. माधव रामचंद्र पराडकर, डिचोली, गोवा. (२८.५.२०२०)