चीनने रशियाला सैनिकी साहाय्य केले, तर चीनवर कारवाई करण्यास मागे-पुढे पहाणार नाही ! – अमेरिकेची चीनला चेतावणी

रशिया आणि युक्रेन युद्ध

वॉशिंग्टन (अमेरिका) – युक्रेनसमवेतच्या युद्धात चीन सैनिकी उपकरणांच्या माध्यमातून रशियाला साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाला पाठिंबा देणार्‍या कोणत्याही कृतीला चीन उत्तरदायी असेल. चीनने असे काही केल्यास आम्ही त्याच्यावर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी चेतावणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी दिली. रशिया आणि युक्रेन युद्धात चीनकडून रशियाला सहकार्य करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनला ही धमकी दिली.

ब्लिंकन पुढे म्हणाले की, सर्व देशांनी कोणत्याही मार्गाचा वापर करावा; पण  रशियाला युद्ध संपवण्यास भाग पाडावे, असे आवाहन आम्ही करतो. युद्ध थांबवण्यासाठी चीनने प्रयत्न करावेत, असे आमचे मत आहे; मात्र तसे होण्याऐवजी उलट दिशेने वाटचाल चालू आहे.