अग्निहोत्र केल्याने वातावरण आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध होते ! – कु. कनक भारद्वाज, हिंदु जनजागृती समिती

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

‘विश्व अग्निहोत्रदिना’निमित्त पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथे विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन

धनबाद (झारखंड)- आज वातावरणातील प्रदूषण प्रचंड वाढले आहे. यावर मात करण्यासाठी हिंदु धर्मातील अथर्ववेद आणि यजुर्वेद यांमध्ये ‘अग्निहोत्र’ ही साधी आणि सोपी अशी वैदिक हवन पद्धत सांगितली आहे. ‘अग्निहोत्रा’मुळे प्रदूषण नष्ट होऊन वातावरण आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध होते, तसेच प्रतिदिन ‘अग्निहोत्र’ केल्याने व्यक्तीचा तणाव न्यून होतो आणि त्याची ऊर्जा वाढते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. कनक भारद्वाज यांनी केले. समितीच्या वतीने ‘विश्व अग्निहोत्र दिना’निमित्त पूर्व आणि पूर्वाेत्तर भारतातील जिज्ञासूंसाठी एका विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचा लाभ झारखंडमधील धनबाद, कतरास, जमशेदपूर, रांची, हजारीबाग, रामग आदी भागांतील जिज्ञासूंनी घेतला.

कु. कनक भारद्वाज

या वेळी अग्निहोत्राविषयी अधिक माहिती देतांना कु. भारद्वाज यांनी ‘अग्निहोत्रामुळे आपले रक्षण कसे होते ? संभावित तिसर्‍या महायुद्धामध्ये अग्निहोत्रामुळे आपले रक्षण कसे करू शकतो ?’, यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य संघटक श्री. शंभु गवारे यांनी उपस्थितांचे शंकानिरसन केले.

क्षणचित्रे

१. या कार्यक्रमामध्ये नियमितपणे अग्निहोत्र करणार्‍या जिज्ञासूंनी त्यांचे अनुभव सांगितले.

२. एका जिज्ञासूने सांगितले की, कोरोनाच्या काळात अग्निहोत्र केल्याने त्यांच्या घरातील सदस्याचा कोरोना लवकर बरा झाला.