‘डेल्टा एअरलाइन्स’ या जागतिक विमान आस्थापनाचा दावा
अॅटलांटा (अमेरिका) – जागतिक विमान आस्थापन ‘डेल्टा एअरलाइन्स’ने रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम म्हणून वाढत चाललेल्या तेलाच्या किमतीमुळे विमान प्रवास १० टक्क्यांनी महाग होऊ शकतो, याचे सूतोवाच केले आहे. युद्ध चालू झाल्यापासून तेलाची किंमत ही गेल्या १४ वर्षांतील सर्वाधिक असल्याचे वृत्त आहे. एमिरेट्स, जपान एअरलाइन्स आणि एअर एशिया या मोठ्या विमान आस्थापनांनी आधीच अधिभार लावून विमान भाडे वाढवले आहे. ‘डेल्टा एअरलाइन्स’ आस्थापनाचे प्रमुख एड बॅस्टेन यांनी सांगितले, ‘आमच्या आस्थापनाच्या आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्या विमानांचे भाडेही १० टक्क्यांहून अधिकने महागणार आहे.’ युरोपचे सर्वांत मोठे विमान आस्थापन ‘र्यान एअर’नेही विमान भाड्यात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत.
Airline giant Delta warns oil increases mean higher ticket prices https://t.co/fKG6Fbr8C8
— BBC News (World) (@BBCWorld) March 18, 2022
कोरोना महामारीच्या आधी वर्ष २०१९ मध्ये ‘डेल्टा एअरलाइन्स’मधून प्रवास करणार्यांची संख्या ही २० कोटींहून अधिक होती. प्रवासींच्या संख्येचा विचार करता हे आस्थापन जगातील दुसरे सर्वांत मोठे विमान आस्थापन आहे.
भारतावर काय होणार परिणाम ?भारतातील तेल आस्थापनांनी १६ फेब्रुवारी या दिवशी ‘एविएशन टर्बाइन फ्युएल’ (ए.टी.एफ्.) या विमानांसाठी लागणार्या तेलाचे मूल्य तब्बल १८ टक्क्यांनी वाढवल्याने भारतातही विमान प्रवास महागडा होण्याचे संकेत मिळाले आहेत. या तेलाच्या किमतीमध्ये गेल्या अडीच मासांमध्ये ६ वेळा वाढ झाली असून एकूण मूल्य हे तब्बल ५० टक्क्यांनी महागले आहे. गेल्या ४ मासांमध्ये असलेल्या निवडणुकांच्या वातावरणामुळे पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे ए.टी.एफ्. तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. ‘इंडिगो एअरलाइन्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजय दत्त यांच्या मते, ‘गेल्या ७ वर्षांत कच्च्या तेलाची किंमत ही सर्वाधिक झाली असून ती १४० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोचली आहे. त्यामुळे ए.टी.एफ्. तेल प्रचंड महागले. विमान प्रवासाच्या खर्चामध्ये या तेलाचे मूल्य ४५ टक्के प्रभाव पाडत असल्याने विमान प्रवास महागडा होणार आहे.’ |