खासगी शाळेत पालकांना मारहाण झाल्याचे प्रकरण
गुन्हा नोंद करण्यासमवेत त्यांच्यावर कारवाई होण्यासाठीही पाठपुरावा घ्यावा, असेच पालकांना वाटते. – संपादक
पुणे – राज्यातील सर्व खासगी शाळांनी पालक आणि विद्यार्थी यांना अतिशय सामंजस्याने वागवण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही विद्यार्थ्यास शुल्काअभावी शाळेतून घरी पाठवू नये, अथवा त्यासाठी पालकांना नाहक त्रास देऊ नये. यासाठी शालेय शिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी. असे सांगत पुण्यातील खासगी शाळेत पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणात शाळा संचालक आणि बाउन्सर यांच्यावर (सुरक्षारक्षकावर) गुन्हा नोंद करण्याच्या सूचना १५ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिल्या. पुणे येथे एका खासगी शाळेत शुल्क भरण्यावरून पालकास बाउन्सरकडून मारहाण झाल्याचा प्रकार नुकताच घडला होता. या पार्श्वभूमीवर विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
नीलम गोर्हे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकारच्या गैरवर्तन करणार्या राज्यातील शहरी भागातील अनेक शाळांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या असून त्यांचा आढावा घेण्यात येत आहे. खासगी शाळांमध्ये बाउन्सर नेमण्याची वेळ का येते ? याविषयी चौकशी होणे अत्यावश्यक आहे. पुणे, रायगड आणि मुंबईमधील काही खासगी शाळांच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आलेल्या असून शासनाला असलेल्या अधिकारांचा योग्य तो वापर करून याविषयी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले आहेत. (शहरी भागातील अनेक शाळांच्या तक्रारी येतात, तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही का ? त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यास तक्रारी येणे बंद होईल. कार्यवाही करण्याचे आदेश देऊन न थांबता पुढील कारवाई झाली का ? याचाही पाठपुरावा घ्यावा, असेच पालकांना वाटते. – संपादक)