युद्धामुळे पेट्रोलचे दर वाढल्यामुळे श्रीलंकेत प्रचंड महागाई !
|
कोलंबो – रशिया – युक्रेन युद्धाचे दृश्य परिणाम विविध देशांत जाणवू लागले आहेत. श्रीलंकेत पेट्रोलचे दर वाढल्याने सर्वच क्षेत्रांत महागाई वाढली आहे. त्यात जोडीला अन्नधान्य टंचाईचे संकटही उभे ठाकले आहे. कोरोनामुळे भयंकर आर्थिक अडचणींना या देशाला सामोरे जावे लागत आहे. दुधाचे दर सोन्याहून अधिक झाले आहेत. महागाईमुळे गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जवळपास १ सहस्र बेकर्या बंद पडल्या आहेत. ब्रेडच्या एका पाकिटाची किंमत १५० रुपयांवर पोहचली आहे. या सर्वांमुळे महगाई वाढून कर्जबाजारी झाल्यामुळे श्रीलंका ‘दिवाळखोर देश’ घोषित होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
श्रीलंकेत महागाईचा महापूर; ब्रेडचे पाकीट १५० रुपयांना, दिवाळखोरीची घोषणा होण्याची शक्यता https://t.co/vKzqG1AcF9
— Lokmat (@lokmat) March 14, 2022
श्रीलंकेत दिवसभरात ७ घंट्यांपेक्षा अधिक वेळ वीज जात असल्याने लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय अगोदरच ठप्प झाला आहे. जवळपास ५ लाख लोकांचा रोजगार पर्यटनावर अवलंबून आहे, तर २० लाख लोक अप्रत्यक्षपणे पर्यटनाशी जोडले गेलेले आहेत. जानेवारीत श्रीलंकेची परकीय चलन गंगाजळी ७० टक्के अल्प होऊन २.३६ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. श्रीलंकेला आगामी १२ मासांत ५४ सहस्र कोटी रुपयांचे देशांतर्गत आणि विदेशी कर्ज चुकते करायचे आहे.