मडगाव (गोवा) येथील ‘आयनॉक्स’मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ ‘हाऊसफूल’ नसतांना तशी सूचना !

हिंदुत्वनिष्ठांनी ‘आयनॉक्स’च्या व्यवस्थापकाला विचारला जाब, व्यवस्थापकाकडून उडवाउडवीची उत्तरे !

संपूर्ण गोवा राज्यात केवळ तीन चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित !

मडगाव (गोवा) – येथील ओशिया कमर्शियल आर्केडमध्ये असलेल्या ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित केला जात आहे. १२ मार्च या दिवशी या चित्रपटाच्या खेळाला ३० ते ४० टक्के जागा रिकाम्या असतांना चित्रपटगृहाबाहेर ‘हाऊसफूल’ची पाटी लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच ‘बूक माय शो’ या चित्रपट पहाण्यासाठी ऑनलाइन आरक्षण (बुकिंग) करणार्‍या संकेतस्थळावरही ‘हाऊसफूल’ची सूचना प्रसारित करण्यात आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. जयेश नाईक आणि इतर हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात ‘आयनॉक्स’च्या व्यवस्थापकांना खडसावले. त्या वेळी व्यवस्थापकांनी यासंदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर ‘व्हायरल’ (प्रसारित) होत आहे.

गोवा राज्यात अनेक चित्रपटगृहे असतांनाही आतापर्यंत केवळ ३ चित्रपटगृहांमध्येच ‘द कश्मीर फाइल्स’ लागला असल्याची माहितीही समोर आली आहे. यामध्ये मडगाव येथील ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहात केवळ १ खेळ, पणजी येथील डीबी रोडवर असलेल्या ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहातही १ खेळ, तर बार्देश तालुक्यातील मॉल दे गोवा येथील ‘ऑयनॉक्स’ चित्रपटगृहात २ खेळ असल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणार्‍या चित्रपटाच्या विरोधात षड्यंत्र ! – हिंदुत्वनिष्ठांची संतप्त प्रतिक्रिया

श्री. जयेश नाईक आणि इतर हिंदुत्वनिष्ठ यांनी या वेळी व्यवस्थापनाला विचारले, ‘‘चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांचे ‘पोस्टर’ चित्रपटगृहाच्याबाहेर लावलेले आहेत; मात्र चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होऊनही त्याचे एकही ‘पोस्टर’ चित्रपटगृहाच्या बाहेर का लावलेले नाही ? ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चालू असतांना चित्रपटगृहात ३० ते ४० टक्के जागा रिक्त असतांनाही चित्रपट ‘हाऊसफूल’ असल्याचे चित्रपटगृहाचे व्यवस्थापन कोणत्या आधारावर सांगते ? चित्रपटगृहातील रिक्त जागांची तिकिटांची विक्री झालेली असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे असेल, तर ही तिकिटे कुणी विकत घेतली, याविषयी सविस्तर तपशील व्यवस्थापनाने द्यावा. आम्ही याविषयी गप्प बसणार नाही; कारण हे मोठे षड्यंत्र आहे. ‘लोकांनी चित्रपट पाहू नये’ आणि ‘चित्रपटाला लोकांची पसंती नाही’, असा आभास निर्माण करण्यासाठीचे एक मोठे षड्यंत्र आहे.’’ चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने याविषयी ‘चौकशी करतो’, असे मोघम उत्तर दिले.

हिंदुत्वनिष्ठांनी संपर्क साधल्यानंतर वास्को येथील ‘झेड् स्क्वेअर’ चित्रपटगृहात ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित करण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय

‘द कश्मीर फाइल्स’ वास्को येथील नामांकित चित्रपटगृह ‘झेड् स्क्वेअर’मध्ये प्रदर्शित न झाल्याने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी वास्को येथील ‘झेड् स्क्वेअर’ चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला याविषयी विचारले. त्यानंतर हा चित्रपट वास्को येथील ‘झेड् स्क्वेअर’ चित्रपटगृहात १३ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता प्रदर्शित करणार असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.

गोव्यात ‘चित्रपट जिहाद’ ! – हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा

गोव्यात आता ‘चित्रपट जिहाद’ला प्रारंभ झाला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तिकीटविक्री दाबून ठेवणे आणि चित्रपटाला लोकांची पसंती नसल्याचा आभास निर्माण करणे, असा प्रकार गोव्यात चालू झाला आहे. मडगाव येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. जयेश नाईक यांनी या प्रकाराविषयी संबंधितांना जाब विचारला. यासाठी त्यांचे पुष्कळ अभिनंदन !