देशात हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक अहवाल  

सरकारी यंत्रणेत शिरकाव करण्याची विशिष्ट समुदायाची योजना !

कर्णावती (गुजरात) – देशातील फुटीरतावादी शक्तींचा वाढता प्रभाव हे मोठे आव्हान आहे. जसजसा जनगणनेचा काळ जवळ येत आहे, तसे ‘आम्ही हिंदू नाही’ हे सांगण्यासाठी समुदायांना उद्युक्त केले जात आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. हा अहवाल संघाच्या येथील ३ दिवसीय प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आला. ‘राज्यघटना आणि धार्मिक स्वातंत्र्य यांच्या नावाखाली देशात कट्टरता, तसेच धार्मिक उन्माद पसरवला जात आहे. याद्वारे स्वतःचा उद्देश साध्य करण्यासाठी सरकारी यंत्रणेत शिरकाव करण्याची विशिष्ट समुदायाची योजना आहे’, अशी चेतावणीही या अहवालात देण्यात आली आहे. ‘समाजाला जागरूक करून याचा सामना करावा’, असे आवाहनही यात करण्यात आले आहे.

या अहवालात म्हटले आहे, ‘धार्मिक कट्टरता हे आव्हान आहे.’ यासाठी कर्नाटकमध्ये हिजाबच्या वादात एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याचा, तसेच केरळचा संदर्भ दिला आहे.