‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या संदर्भातील सेवा करतांना बंगाल आणि सांगली (महाराष्ट्र) येथील साधकांनी केलेले प्रयत्न, त्यांना मिळालेला प्रतिसाद अन् शिकायला मिळालेली सूत्रे

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला बंगाल आणि सांगली (महाराष्ट्र) येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक या सर्वांपर्यंत गुरुमाऊलींची ज्ञानगंगा पोचली. गुरुदेवांची ज्ञानशक्ती आणि संतांचे लाभलेले मार्गदर्शन यांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा लाभ घेण्यासाठी समाजातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी, वाचक अन् हितचिंतक मोठ्या संख्येने अभियानात कृतीशील सहभाग घेत आहेत. ‘हा प्रतिसाद पाहून गुरुदेवांची ज्ञानगंगा प्रवाहित होऊन सर्व जण त्या चैतन्यात न्हाऊन निघत आहेत’, अशी अनुभूती सर्वांनी घेतली.

दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

सौ. तनुश्री सियाराम साहा, कोलकाता, बंगाल.

सौ. तनुश्री साहा

१. दिरांच्या श्राद्धाच्या वेळी नातेवाइकांना ग्रंथ दाखवून साधनेविषयी सांगणे आणि एका नातेवाईकाने ग्रंथांची मागणी देऊन आश्रमात अन्नदान करण्यासाठी काही रक्कम अर्पण करणे

‘डिसेंबर २०२१ मध्ये मला माझ्या मोठ्या दिरांच्या श्राद्धासाठी मुंगेर (बिहार) येथे जायचे होते. तेथे जाण्यापूर्वी मी काही ग्रंथ माझ्या नातेवाइकांना देण्यासाठी आणि जिज्ञासूंना दाखवण्यासाठी समवेत घेतले होते. श्राद्धाच्या वेळी आमचे पुष्कळ नातेवाइक आले होते. त्या वेळी भगवंताने माझ्याकडून ‘नातेवाइकांना ग्रंथ दाखवणे आणि साधनेविषयी सांगणे’, ही सेवा करवून घेतली. कुटुंबातील एक युवा सदस्य धार्मिक वृत्तीचे असून ते व्यवसाय करतात. ते सण आणि उत्सव यांच्या वेळी अन्न अन् मिठाई यांचे वितरण करतात. मी त्यांना ग्रंथ आणि सात्त्विक वस्तू देण्याचे महत्त्व सांगितल्यावर ते त्यासाठी आनंदाने सिद्ध झाले. ते त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त इतरांना ग्रंथ देणार आहेत. त्यासाठी त्यांनी ग्रंथांची मागणी दिली. त्यांनी आश्रमात अन्नदान करण्यासाठी काही रक्कम अर्पण केली.

२. सरपंचांना ग्रंथ दाखवल्यावर त्यांनी गावातील विद्यालयांत ग्रंथ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देणे

मी गावी गेल्यावर मला समजले, ‘सरपंचपदी एका युवकाची नेमणूक झाली आहे आणि ते पुष्कळ सात्त्विक आहेत.’ तेव्हा मी विचार केला, ‘त्यांना भेटता आले, तर त्यांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’विषयी सांगावे.’ ईश्वरकृपेने सरपंचांना भेटण्याचे नियोजन झाले. ते आमच्या घरी आले. तेव्हा थोडी अनौपचारिक चर्चा झाल्यानंतर मी त्यांना ‘ज्ञानशक्ती अभियाना’विषयी सांगून ग्रंथ दाखवले. त्यांनी ग्रंथ पहाताच ते वाचायला आरंभ केला. बराच वेळ ते ग्रंथ वाचत होते. ते एवढ्या एकाग्रतेने ग्रंथ वाचत होते की, त्यांना आजूबाजूचे काही ऐकू येत नव्हते. नंतर त्यांनी सांगितले, ‘‘हे ग्रंथ एवढे चांगले आहेत की, प्रत्येक घरात हे ग्रंथ असले पाहिजेत. या ग्रंथाचा प्रसार करण्यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन. हे ग्रंथ वाचल्यानंतर समाजात जागृती होईल.’’ त्यांनी ग्रंथ गावातील विद्यालयांत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.’

३. कृतज्ञता

‘गुरुकृपेने मला या दैवी अभियानात सहभागी होण्याची अमूल्य संधी मिळाली’, त्याबद्दल गुरुदेवांच्या विश्वव्यापक चरणी जण कोटीशः कृतज्ञ आहे.’


सौ. कल्पना थोरात, जिल्हा सांगली, महाराष्ट्र.

सौ. कल्पना थोरात

१. श्री. अविनाश कुडचे यांनी मराठी आणि कन्नड या भाषांतील ग्रंथांची मागणी देणे

‘मिरज येथील श्री. अविनाश कुडचे यांना संपर्क केल्यावर त्यांनी कुटुंबातील सर्वांना एकत्र बोलावले आणि साधकांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’विषयी माहिती सांगण्यास सांगितले. साधकांनी ग्रंथांविषयी माहिती दिल्यावर त्यांनी स्वतःसाठी आणि मुलांसाठी मराठी भाषेतील अन् महिलांसाठी कन्नड भाषेतील ग्रंथांची मागणी दिली. ते म्हणाले, ‘‘मी ग्रंथांचे वाचन करून काही शंका असल्यास तुम्हाला विचारीन.’’

२. ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. सुनीता माळी यांनी महिला मंडळातील महिलांना संक्रांतीचे वाण देण्यासाठी ग्रंथांची मागणी देणे

‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. सुनीता माळी यांचे महिला मंडळ आहे. त्यांना संपर्क केल्यावर त्यांनी महिला मंडळातील महिलांना मकरसंक्रांतीचे वाण देण्यासाठी ग्रंथांची मागणी केली. ‘तुम्ही धर्मासाठी इतके करता, तर माझ्याकडूनही धर्मकार्य घडू दे’, असे त्या म्हणाल्या.

३. सामाजिक कार्यकर्ते श्री. अभय भंडारी यांनी शाळेच्या वाचनालयासाठी ग्रंथ प्रायोजित करणे

विटा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अभय भंडारी यांना संपर्क केल्यावर ते म्हणाले, ‘‘या ग्रंथांतील ज्ञान सर्वांपर्यंत पोचले पाहिजे. हे ग्रंथ केवळ शाळेच्या वाचनालयात पडून रहायला नकोत. शाळेतील प्रार्थनेच्या वेळी या ग्रंथांतील एक पृष्ठ तरी सर्वांना वाचून दाखवायला हवे, जेणेकरून विद्यार्थी त्यानुसार आचरण करतील.’’ त्यानंतर त्यांनी ग्रंथ प्रायोजित करून शाळेच्या संचालकांना भ्रमणभाषवर ‘वाचनालयासाठी ग्रंथ भेट देत आहे’, असे असल्याचे सांगितले.

४. श्री. अमर श्रीकांत साळोखे यांनी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात देण्यासाठी ग्रंथांची मागणी देणे

राधानगरी येथील साधकांचे नातेवाईक श्री. अमर श्रीकांत साळोखे हे शिक्षक आहेत. साधकांनी श्री. साळोखे यांना ‘आदर्श पालक कसे व्हावे ?’, या ग्रंथाविषयी माहिती सांगितली. तेव्हा त्यांनी शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात देण्यासाठी ग्रंथांची मागणी दिली.

५. खानापूर तालुक्यातील पारे येथील श्री. संजय साळुंखे यांनी मुलीच्या विवाहपत्रिकेच्या समवेत देण्यासाठी ‘देवघर आणि पूजेतील उपकरणे’ हे लघुग्रंथ विकत घेतले.’

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक