होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

हिंदु जनजागृती समितीचे विटा येथे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना निवेदन

विटा (जिल्हा सांगली), ११ मार्च (वार्ता.) – रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे; तसेच आरोग्याला घातक असणारे रंग फासणे असे अपप्रकार वाढत चालले आहेत.

विटा येथे तहसीलदार ऋषिकेश शेळके (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या

तरी होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीने रंग खेळणे, मार्गस्थ आणि स्त्रिया यांवर फुगे मारणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान-धूम्रपान करणे आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विटा येथील तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना निवेदन देण्यात आले.

सौ. इंदिराबाई भिडे कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निता जोशी (डावीकडे बसलेल्या) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या

१. सौ. इंदिराबाई भिडे कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निता जोशी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अलका रोकडे आणि सौ. अमृता गुळवणी उपस्थित होत्या.

नगरसेविका सौ. प्रतिभा चोथे (डावीकडून तिसर्‍या) यांना निवेदन देतांना धर्मशिक्षणवर्गातील सौ. रूपाली चव्हाण (उजवीकडे), तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या

२. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सौ. प्रतिभा चोथे यांना निवेदन देतांना धर्मशिक्षणवर्गातील सौ. रूपाली चव्हाण, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अलका रोकडे आणि सौ. अमृता गुळवणी उपस्थित होत्या. निवेदन स्वीकारल्यावर सौ. प्रतिभा चोथे यांनी ‘तुमचे कार्य चांगले असून यापुढेही नेहमी सहकार्य करू’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.