मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण ४७१ किलोमीटर रस्त्यांपैकी २७७ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे सर्व बांधकाम मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ७ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार ?’ या उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर बांधकाममंत्र्यांनी ही माहिती दिली.

रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत ३-४ वेळा बैठक झाली आहे. काही कंत्राटदारांनी कामाला विलंब केल्यामुळे त्यांच्याकडून ठेका काढून घेतल्यामुळे ते न्यायालयात गेले आहेत. असे असले, तरी काम चालू आहे.