राजकारण्यांचा भ्रष्टाचार प्रथम संपवा !

नवाब मलिक

कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध आणि आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य केल्याच्या गंभीर आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री, तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना ‘ईडी’ने अटक केली आहे. कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याची बहीण हसिना पारकर हिच्या संपर्कात असलेल्या लोकांकडून कोट्यवधी रुपयांची भूमी खरेदी केल्याचा आरोप मलिक यांच्यावर आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण लवकरात लवकर पूर्ण होऊन योग्य ती कारवाई व्हावी, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?

गेल्या वर्षी नवाब मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थाच्या व्यवहारात अटक केल्यानंतर मलिक यांनी अमली पदार्थविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप करून त्यांना अडचणीत आणले. त्यानंतर अभिनेते शाहरुख खान यांचे पुत्र आर्यन खान यालाही अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांनी वानखेडे यांच्यावर आरोप केले. २३ डिसेंबर २०२१ या दिवशी विधानसभेत नवाब मलिक यांनी ‘डॉ. कलबुर्गी आणि डॉ. दाभोलकर यांची हत्या करणार्‍यांमागे सनातनसारख्या संघटनांचा हात आहे’, असा बिनबुडाचा अन् गंभीर आरोप केला.

एकूणच या संपूर्ण प्रकरणात आता पुढील कार्यवाही किती जलद गतीने होते, याकडे राज्याच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे असेल, तर त्याचा प्रारंभ भ्रष्ट राजकारण्यांच्या कारवाईपासून केल्यास देशात अन्य कुणी भ्रष्टाचार करण्याचा विचार करणार नाही, हे निश्चित ! काँग्रेसनेच भारताची प्रतिमा ‘भ्रष्टाचारी भारत’ केली आहे. त्यामुळे आता काँग्रेससह सर्वपक्षीय राजकारण्यांचा भ्रष्टाचार उघड करून त्यांना कठोर कारवाई करण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा !

– श्री. सचिन कौलकर, मुंबई.