प्रेमभाव असलेले आणि वारकरी संप्रदायानुसार भावपूर्ण साधना करणारे ईश्वरपूर (इस्लामपूर, सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), २ मार्च (वार्ता.) – प्रेमभाव असलेले आणि सचोटीने वारकरी संप्रदायानुसार भावपूर्ण साधना करणारे, सतत देवाच्या अनुसंधानात असलेले, तसेच मुलाला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे ईश्वरपूर येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. श्री. राजाराम नरुटे हे सनातन संस्थेच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांचे वडील आहेत. ही आनंदवार्ता सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना थोरात यांनी २३ फेब्रुवारी २०२२ या दिवशी झालेल्या एका सत्संगात दिली. येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातनचे साधक श्री. राजाराम मोरे यांनी श्रीकृष्णाचे चित्र आणि प्रसाद देऊन श्री. नरुटे यांचा सत्कार केला.
या प्रसंगी श्री. राजाराम नरुटे यांची मुलगी सौ. मंगल शंकर काजारे (वय ४५ वर्षे), नात कु. प्रतीक्षा शंकर काजारे (वय २५ वर्षे) आणि नातू कु. प्रमोद शंकर काजारे (वय २१ वर्षे) यांसह अन्य साधक उपस्थित होते.
श्री. राजाराम भाऊ नरुटे यांच्या पत्नी कै. शालन राजाराम नरुटे यांचीही आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता ! – राजाराम नरुटे
मनोगत व्यक्त करतांना श्री. राजाराम नरुटे म्हणाले, ‘‘तुझ आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी’ याप्रमाणे असून जे आहे ते आपल्यापाशीच आहे. जर गुरूंचे योग्य मार्गदर्शन असेल, तर मनुष्य जन्म-मृत्यूच्या चक्रांतून बाहेर पडू शकतो. हा देह नाशवंत आहे. त्यामुळे आज जो काही सत्कार झाला त्याविषयी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटते.
गुरूंवरील दृढ श्रद्धा आणि सतत इतरांचा विचार यांसह अन्य गुणांमुळे नरुटेकाका गुरुकृपेला पात्र ठरले ! – सौ. कल्पना थोरात
नरुटेकाका यांच्यात सहजता जाणवते. गुरूंवरील दृढ श्रद्धा आणि सतत इतरांचा विचार यांसह अन्य गुणांमुळेच श्री. राजाराम नरुटेकाका गुरुकृपेला पात्र ठरले !
वडिलांचे बोलणे नेहमी आध्यात्मिक स्तरावरच असते ! – श्री. शंकर नरुटे (श्री. राजाराम नरुटे यांचा मुलगा)
या प्रसंगी दूरभाषद्वारे जोडलेले आणि देवद आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे सनातनचे साधक श्री. शंकर नरुटे म्हणाले, ‘‘बाबांकडे पाहूनच त्यांची प्रगती झाली असेल’, असे वाटत होते. आयुष्यात पंढरीच्या वारीसह त्यांनी जे केले ते निष्ठेने केले. त्यांचे नेहमीचे बोलणेही आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावरच असते. ते कधीही मायेतील विषयांच्या संदर्भात चर्चा करत नाहीत.’’
विशेष
१. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर श्री. राजाराम नरुटे यांच्या तोंडवळ्यावर विशेष तेज जाणवत होते.
२. घोषणा झाल्यावरही श्री. नरुटेकाका स्थिर होते. या प्रसंगात त्यांनी कृतज्ञतेने हात जोडले. ‘श्रीविष्णुने भक्त प्रल्हादाचे रक्षण केले, तसेच गुरु आपले नेहमी रक्षण करतात’, असे ते म्हणाले.
३. वयाच्या ९० व्या वर्षीही श्री. नरुटेकाकांची प्रकृती चांगली असून साधनेच्या बळामुळेच त्यांना कोणताही आजार नाही, तसेच ते कायम आनंदी-हसतमुख असतात.
श्री. राजाराम नरुटे यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
श्री. शंकर नरुटे यांना त्यांचे वडील श्री. राजाराम भाऊ नरुटे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. वयस्कर असूनही साधनेमुळे प्रकृती चांगली असणे
‘जुलै २०२२ मध्ये माझे वडील श्री. राजाराम भाऊ नरुटे यांना ९० वर्षे पूर्ण होतील. ते त्यांच्या साधनेत व्यस्त असल्यामुळे त्यांना स्वतःच्या देहाचा विचार नसतो. ते वयस्कर असूनही त्यांचे आरोग्य चांगले आहे. त्यांना क्वचितच औषधे घ्यावी लागतात.
२. कष्टमय जीवन आणि प्रामाणिकपणे शेतीची कामे करणे
वडिलांनी लहानपणापासून कष्टाची कामे केलेली आहेत. पूर्वीपासून ते इतरांच्या शेतात चाकरी करायचे. त्या वेळी ते शेतात राहून रात्रंदिवस काम करायचे आणि कित्येक मास घरी येत नसत. त्यांचे शेतमालक त्यांना शेतीचे सर्व दायित्व द्यायचे. ते शेतमालकांच्या घरातील कामेही करत असत. त्यामुळे ते शेतमालकांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे वागत होते. त्यांनी सर्व कामे प्रामाणिकपणे केल्यामुळे गावातील लोक आजही त्यांचे कौतुक करतात.
३. पूजेसाठी फुले आणणे
उतार वयातही माझे वडील प्रतिदिन सकाळी उठून झाडावरील फुले काढतात. ती फुले पूजेसाठी शेजार्यांना आणि आमच्या घरातील देवांसाठी देतात. तसेच ते घराशेजारील मंदिरात जाऊन देवाला फुले वहातात.
४. प्रेमभाव
वडिलांना इतरांना काहीतरी देणे आणि साहाय्य करणे फार आवडते. शेतातून शेंगदाणे किंवा काहीतरी खाण्यासारख्या वस्तू असतील, तर ते खिशातून आणून लहानपणी आम्हाला आणि शेजार्यांना द्यायचे. एखादी वस्तू स्वतः खाण्यापेक्षा इतरांना देण्यात त्यांना आनंद मिळतो. ‘त्यांचे गावातील लोकांशी भांडण झाले’, असे कधीच झाले नाही. ते सर्वांशी प्रेमाने वागत आले. त्यामुळे आमच्या नातेवाईकांमध्ये आणि गावातील लोकांमध्ये त्यांना चांगले स्थान आहे.
५. स्वतः भावपूर्ण साधना करणे आणि इतरांना धार्मिक कथा सांगणे
वडील कलंकी केशव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांनुसार साधना करायचे. त्यांच्याकडे येणार्या प्रत्येकाला ते पुराणातील कथा, संतांच्या कथा आणि अध्यात्माचे अर्थ समजणार्या कथा सांगायचे. तेव्हा ‘त्यांचे गुरु आणि देव यांच्याविषयी ते पुनःपुन्हा भाव व्यक्त करत आहेत’, हे माझ्या लक्षात आले.
६. मुलाला साधना आणि सेवा करण्यास साहाय्य करणे
मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात रहायला गेल्यापासून घरी वेगवेगळ्या अडचणी आल्या; पण ‘साधना सोडून तू घरी ये’, असे वडिलांनी मला कधीही सांगितले नाही. कधीतरी ते मला म्हणायचे की, तू घरी राहून काही सेवा कर. काही दिवस घरी ये.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती त्यांच्या मनात भाव आणि श्रद्धा असल्यामुळे ते मला म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे साधना करून तू प्रगती कर.’’
– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), देवद आश्रम, पनवेल.(३१.१.२०२२)