बेंगळुरू दंगलीच्या प्रकरणात धर्मांधाला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

सर्वोच्च न्यायालयाचा बेंगळुरू दंगलीच्या प्रकरणातील आरोपी महंमद कलीम याला जामीन देण्यास नकार

देहली – सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०२० मध्ये झालेल्या बेंगळुरू दंगलीच्या प्रकरणातील आरोपी महंमद कलीम याला जामीन देण्यास नकार दिला. कलीम याने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. २८ फेब्रुवारी या दिवशी ही याचिका फेटाळण्यात आली. याआधीही कलीम याने उच्च न्यायालयात विशेष न्यायालयाच्या जामीन न देण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते; मात्र उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा जामीन फेटाळण्याचा निकाल कायम ठेवला होता. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या २ सदस्यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली.

कर्नाटक उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निकाल कायम ठेवत म्हटले होते, ‘अनेक पुराव्यांची पडताळणी केली असता दंगलीच्या वेळी कलीम तेथे उपस्थित होता आणि त्याने सरकारी आणि वैयक्तिक मालकीच्या संपत्तीची हानी केली. त्या वेळी पोलिसांवरही आक्रमण करून लोकांच्या मनात भय निर्माण केले.’

११ ऑगस्ट २०२० ला झाली होती बेंगळुरू येथील दंगल !

११ ऑगस्ट २०२० या दिवशी काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या नातेवाइकाने महंमद पैगंबर यांच्यावरील कथित आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप करत २०० ते ३०० धर्मांधांनी मूर्ती यांच्या निवासस्थानावर आक्रमण करत इमारतीची तोडफोड केली. त्या वेळी त्यांनी पोलिसांची वाहनेही पेटवली. या दंगलीच्या वेळी २ पोलीस ठाण्यांवर आक्रमण करून तेथे मोठ्या प्रमाणात दगडफेकही करण्यात आली होती.