तात्काळ कीव सोडा ! – दूतावासाकडून भारतियांना सूचना

प्रातिनिधिक छायाचित्र

कीव (युक्रेन) – विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांनी उपलब्ध गाड्यांद्वारे किंवा उपलब्ध इतर कोणत्याही माध्यमांद्वारे तातडीने कीव सोडण्याची सूचना युक्रेनमधील भारतीय दूतावासाने १ मार्च या दिवशी दिली. रशियाचे सैन्य वेगाने कीवकडे आगेकूच करत असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे.

युक्रेनमधून ८ सहस्र भारतीय बाहेर पडले !

युक्रेनमधून आतापर्यंत ८ सहस्र भारतीय नागरिक बाहेर पडले आहेत. यांतील १ सहस्र ३९६ नागरिकांना विमानांतून देशात परत आणण्यात आले आहे. युद्ध चालू झाल्यापासून युक्रेनमधून आतापर्यंत युक्रेनच्या नागरिकांसह विविध देशांचे ५ लाख नागरिक बाहेर पडले असून त्यांनी पोलंड, रुमानिया आदी शेजारी राज्यांमध्ये आश्रय घेतला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या शेजारील देशांच्या राष्ट्रप्रमुखांना दूरभाष करून मानले आभार !

(डावीकडून) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्लोव्हाकियाचे पंतप्रधान एडवर्ड हिजेर आणि रुमानियाचे पंतप्रधान निकोले-इओनेल सिउका

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आता भारतीय वायूदलाचे सर्वांत मोठी ‘ग्लोबमास्टर’ ही विमाने जाणार आहेत. २८ मार्चला रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या संदर्भात घेतलेल्या मंत्र्यांच्या बैठकीनंतर हे विमान पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधून भारतियांना बाहेर पडण्यासाठी साहाय्य करून त्यांना आश्रय देणार्‍या युक्रेनच्या शेजारील  देशांच्या पंतप्रधानांशी दूरभाषवरून चर्चा करून त्यांचे आभार मानले.

युक्रेनमधून भारतियांना परत आणण्यासाठी रुमानियाकडून केल्या जाणार्‍या साहाय्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी रुमानियाचे पंतप्रधान निकोले-इओनेल सिउका, तसेच स्लोव्हाकियाचे पंतप्रधान एडवर्ड हिजेर यांना दूरभाष करून त्यांचेही आभार मानले.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून रशियाचा संघ निलंबित ! – ‘फिफा’चा निर्णय

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना ‘फिफा’ आणि युरोपमधील फुटबॉल संघटना ‘युईफा’ यांनी  रशियाच्या राष्ट्रीय संघ अन् क्लब यांना आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून पुढील सूचना मिळेपर्यंत निलंबित केले आहे. या निर्णयामुळे रशियाला यंदाच्या विश्‍वचषक आणि महिला युरो स्पर्धेतून वगळले जाण्याची शक्यता आहे.