कैलास पर्वताचा चरणस्पर्श झालेला दगड म्हणजे ‘प्रत्यक्ष शिवाचेच रूप आहे’, असे जाणवणे आणि त्यावर भावपूर्ण रुद्राभिषेक केल्यावर अनेक ‘ॐ’ उमटल्याचे दिसणे

कैलास पर्वताचा चरणस्पर्श झालेला दगड (शाळुंकेवर)

१. कैलास पर्वताच्या चरणस्पर्शाच्या ठिकाणचा दगड, म्हणजे प्रत्यक्ष शिवाचे रूप असल्याचे वाटून त्यावर नियमित रुद्राभिषेक करणे

‘माझी बहीण सौ. केतकी साने हिचे यजमान श्री. शशांक साने हे जुलै २०१९ मध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि अन्य साधक यांच्यासह कैलास-मानससरोवर यात्रेला गेले होते. एप्रिल २०२० मध्ये त्यांनी मला कैलास पर्वताचा चरणस्पर्श झालेला एक दगड दिला होता. ‘तो दगड म्हणजे प्रत्यक्ष शिवाचेच रूप आहे’, असे मला जाणवत होते; म्हणून मी त्या दगडाच्या खाली ठेवण्यासाठी शाळुंका (ज्याच्या मध्यभागी बाण बसवतात, तो शिवलिंगाचा भाग) पहात होतो. त्या दगडाचा आकार लहान असल्यामुळे मला हवी तशी दगडी शाळुंका मिळत नव्हती. काही दिवसांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ शोधतांना शाळुंका मिळाली. तेव्हापासून मी देवघरात त्या पिंडीची पूजा करतो. वर्ष २०२० मधील चातुर्मासात मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने त्यावर ११ सोमवार नियमित रुद्राभिषेक केले.

२. अभिषेक करतांना प्रत्येक पेशीमध्ये शिवाचे अस्तित्व जाणवणे

२६.७.२०२१ या दिवशी श्रावण मासातील पहिला सोमवार असल्यामुळे माझ्या मनात ‘देवघरात असलेल्या शिवपिंडीवर ‘महिम्न स्तोत्र’ म्हणून अभिषेक करावा’, असा विचार आला. सकाळी अभिषेक करत असतांना मला माझ्या प्रत्येक पेशीमध्ये शिवाचे अस्तित्व जाणवत होते.

३. शिवपिंडीवर ‘ॐ’ उमटल्याचे दिसणे

त्या वेळी मला शिवपिंडीवर ‘ॐ’ उमटल्यासारखे जाणवले. मी पिंडी जवळून पाहिली असता त्यावर खरंच ॐ दिसला. ‘मला दिसत असलेले योग्य आहे ना ?’, याची निश्चिती करण्यासाठी मी पिंडीचे एक छायाचित्र काढले आणि ते माझी बहीण

सौ. केतकी साने हिला पाठवले. (मी तिला याविषयी काही सांगितले नव्हते.) तेव्हा तिला आणि तिचे यजमान श्री. शशांक साने यांना पिंडीवर अनेक ॐ दिसले.

४. शिवपिंडीवर शिव-पार्वती बसल्याचे दिसणे

त्याच वेळी मी माझ्या परिचयातील नरसोबावाडी येथील सत्पुरुष पू. गुरुप्रसाद पुजारी यांनाही शिवपिंडीचे छायाचित्र पाठवले. त्यांचे मला लगेच उत्तर आले की, ‘यावर शिव-पार्वती बसलेले दिसत आहेत’, असे मला दिसले. ते वाचल्यावर माझा भाव जागृत झाला आणि मला परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.’

– श्री. नीलेश पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१०.१०.२०२१)