२६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…
गांधीवध प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आरोप करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
देहली येथील न्यायालयात गांधीवधाचा अभियोग चालू होता. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाजूने लढत होते ज्येष्ठ विधीज्ञ ल. ब. भोपटकर ! अभियोग देहलीत होता. त्यामुळे रहायचे कुठे ? असा प्रश्न होता; म्हणून हिंदु महासभेच्या तेथील कार्यालयातच त्यांनी त्यांचे बिर्हाड (निवासस्थान) केले. हिंदु महासभेनेही भोपटकरांना शक्य होईल, त्या सर्व सुविधा दिल्या होत्या.
एके दिवशी अभियोगासंबंधी काही कागदपत्रांचा अभ्यास करत असतांना भोपटकरांचा दूरभाष खणखणला. त्यांनी तो उचलला. पलीकडून बोलणार्या व्यक्तीचा आवाज ऐकताच भोपटकर दचकलेच ! एवढ्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला दूरध्वनी करावा.. कशासाठी ? पलीकडची व्यक्ती म्हणाली, ‘‘मला तुम्हाला भेटायचे आहे.’’ लागलीच भोपटकर म्हणाले, ‘‘तुम्ही केवळ वेळ सांगा. लागलीच तुमच्या कार्यालयात येतो.’’ त्यावर ‘त्या’ व्यक्तीने स्पष्ट नकार दिला आणि सांगितले, ‘‘देहलीबाहेर अमुक ठिकाणी एक मैलाचा दगड आहे. संध्याकाळी अमुक वाजता तिथे या’’ आणि त्या व्यक्तीने दूरभाष ठेवून दिला.
भोपटकर बुचकळ्यात पडले. एकतर एवढ्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला दूरभाष करावा, हे आश्चर्य ! त्यात त्यांनी स्वत:हून भेटीची इच्छा व्यक्त करावी, हे दुसरे आश्चर्य ! बरं, ती भेटही कार्यालयात राजरोस नव्हे, तर एका खुणेच्या ठिकाणी, हे तिसरे आश्चर्य ! आश्चर्यांची मोजणी करतच भोपटकर ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी जाऊन पोचले. समोरून ‘त्या’ व्यक्तीची ‘कार’ आली आणि भोपटकरांना आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला; कारण ती व्यक्ती स्वत:च ‘कार’ चालवत होती. समवेत शोफर (चालक) नाही आणि त्या व्यक्तीचे राजकीय अन् सामाजिक स्थान पहाता साहजिकपणे समवेत असणारा लवाजमाही नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निर्दाेषत्व सिद्ध करण्यामागे झालेले अप्रत्यक्ष साहाय्य !
त्यांनी गाडी थांबवली. भोपटकरांना एक शब्दही बोलायची संधी न देता त्यांना आत घेतले आणि गाडी नेली ती थेट एका निर्जन स्थळाकडे ! तिथे पोचताच त्या व्यक्तीने सांगितले की, सावरकर या खटल्यात निर्दोष आहेत, हे मला पक्के ठाऊक आहे; पण आमच्या मंत्रीमंडळातल्याच एका सर्वोच्च नेत्याला सावरकर यात अडकायला हवे आहेत; म्हणूनच त्यांना गोवण्याचा हा सारा खेळ चालू आहे. आज सकाळीच आम्हा सर्व मंत्र्यांना तसे स्पष्ट आदेश मिळाले. तिथे मला काही बोलता येईना; म्हणून मी तिथून निघाल्यावर तात्काळ तुम्हाला दूरभाष केला. तुम्ही जरादेखील काळजी करू नका. नेटाने लढा. सत्य आपल्या बाजूने आहे. कायद्याचे काहीही साहाय्य लागले, तर विनासंकोच मला सांगा. मी आहे !’’ भोपटकर भावनावेगाने केवळ रडायचेच बाकी होते. बोलणे संपल्यावर त्या व्यक्तीने भोपटकरांना पुन्हा एकवार खुणेच्या जागेवर सोडले. गाडी धुरळा उडवत निघून गेली. पुढे सावरकर त्या खटल्यातून निर्दोष मुक्त झाले, हा इतिहास आहे. ही घटना मामा काणे यांनी त्यांच्या एका लेखात उघड केली आहे. हीच घटना पंढरपूरच्या उत्पातगुरुजींनीही त्यांच्या ग्रंथांत नोंदवून ठेवलेली आहे. भोपटकरांना ऐनवेळी साहाय्यचा दिलासा देणारी, ‘कायद्याचे काहीही साहाय्य लागले, तर मला विनासंकोच सांगा’, असे निर्व्याज भावनेने सांगणारी ती व्यक्ती म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर !
(साभार : सामाजिक माध्यम)