सातारा, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – ओबीसी आरक्षणातील अडचणीमुळे नगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सातारा नगरपालिकेच्या सभागृहाची मुदत २६ डिसेंबर २०२१ या दिवशी संपली. सध्या मुख्याधिकारी प्रशासक म्हणून कारभार पहात आहेत. पालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा सिद्ध होऊन तो वरिष्ठांकडे गेला होता; मात्र ओबीसी आरक्षणाच्या अडचणींमुळे यावर कोणतीही हलचाल झाली नव्हती. २२ फेब्रुवारी या दिवशी निवडणूक आयोगाने पालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित केला आहे.
सातार नगरपालिकेसाठी २ मार्च या दिवशी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. ७ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाला मान्यता द्यायची आहे. नंतर सूचना आणि हरकती यांसाठी ७ दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला असून प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे हे १० मार्चपर्यंत प्रकाशित करायचे आहेत. नंतर सूचना आणि हरकतींसाठी ७ दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. २२ मार्चपर्यंत प्रभाग रचनेविषयी आलेल्या सर्व हरकतींवर जिल्हाधिकारी यांच्या वतीने सुनावणी होणार आहे. नंतर याविषयीचा अभिप्राय २५ मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येईल. १ एप्रिल २०२२ पर्यंत प्रभाग रचना अंतिम करण्यात येऊन ५ एप्रिल या दिवशी त्याची प्रसिद्धी करण्यात येईल. यावर कार्यवाही झाल्यानंतर निवडणुकीचेही कामकाज गतिमान होऊ शकते. एप्रिलमध्ये मतदार याद्या प्रसिद्धी, हरकती पूर्ण होण्याची शक्यता आहे. मे २०२२ मध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रशासकीय अधिकार्यांनी दिली आहे.