सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे श्री. रामदास तुकाराम कोकाटे (वय ३८ वर्षे) !

श्री. रामदास तुकाराम कोकाटे यांना ३८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

माघ कृष्ण पक्ष नवमी, म्हणजे दासनवमी (२५.२.२०२२) या दिवशी श्री. रामदास तुकाराम कोकाटे यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. रामदास कोकाटे

१. मिळून मिसळून वागणे

‘माझे यजमान श्री. रामदास तुकाराम कोकाटे यांना सर्वांमध्ये मिळून मिसळून रहायला आवडते. कुणी नवीन साधक आला, तर ते त्यांच्याशी स्वतः ओळख करून घेऊन त्यांची विचारपूस करतात.

सौ. राधिका कोकाटे

२. इतरांचा विचार करणे

ते सतत इतरांचा विचार करतात. एखाद्याने साहाय्य मागितल्यावर ते कितीही थकले असले, तरी लगेच त्याच्या साहाय्यासाठी जातात. वयस्कर साधक असतील, तर ते त्वरित त्यांच्या साहाय्याला जातात.

३. सेवेची तळमळ

अ. एखाद्या साधकाने त्यांना सेवा सांगितली आणि त्यांना बरे वाटत नसले, तरी ते ती सेवा करण्यासाठी तत्परतेने जातात.

आ. एखादी सेवा करण्यापूर्वी ते त्याचे नियोजन करून ‘ती सेवा गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) कशी आवडेल ?’, या दृष्टीने प्रयत्न करून ती सेवा तळमळीने आणि चिकाटीने करतात.

इ. त्यांना कितीही त्रास झाला, तरी ते ती सेवा पूर्ण झाल्याविना उठत नाहीत. ते त्या सेवेत स्वतःला विसरून जातात.

ई. एक दिवस मी खोलीत कपड्यांच्या घड्या सावकाश घालत होते. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘या सेवेसाठी आपण एवढा वेळ लावला, तर ते गुरुदेवांना आवडणार नाही. ‘अजून पुढची सेवा कशी करू शकतो ?’, असा विचार केला पाहिजे; कारण आपल्याकडे वेळ अल्प आहे.’’

४. साधनेची तळमळ

त्यांचे ‘प्रत्येक कृती करतांना त्यातून साधना कशी होईल ?’, याकडे लक्ष असते. ते प्रत्येक सेवा परिपूर्ण करण्यासाठी देव आणि सहसाधक यांचे साहाय्य घेतात. ते सेवा करतांना ‘स्वतःच्या साधनेचा वेळ कुठे वाया गेला नाही ना ?’, याचे निरीक्षण करतात.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी असलेले अनुसंधान !

अ. खोलीतील साहित्य आवरतांना ‘हे गुरुदेवांचे साहित्य आहे, ते नीट आवरून ठेवले पाहिजे’, असा त्यांचा भाव असतो. ते मला सांगतात, ‘आपण रहात असलेली खोली आणि तेथील सर्व साहित्य गुरुदेवांचेच आहे. सर्व वस्तू नीटनेटक्या आणि योग्य ठिकाणी ठेवाव्यात.’

आ. ते ‘कपड्यांच्या घड्या घालतांना गुरुदेवांच्या कपड्यांच्या घड्या घालत आहोत’, असा भाव ठेवतात. आपण आपला भाव अजून कसा वाढवू शकतो ?’, याविषयीही ते मला सांगतात.

इ. एखाद्या साधकाने त्यांना बोलावले, तर ते हातातील काम तेथेच टाकून लगेच जातात; कारण ‘तो माझ्या गुरुदेवांचा साधक आहे’, असे त्यांना वाटते.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती प्रती असलेला भाव

अ. एकदा मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्हाला एवढा त्रास होतो, तर तुम्ही एवढी सेवा का करता ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मला हे शरीर गुरुदेवांनीच दिले आहे आणि गुरुदेवच माझ्याकडून सर्व करवून घेतात. त्यामुळे हा देह गुरुसेवेसाठी सदैव तत्पर राहील. या त्रासाविषयी मला काहीच वाटत नाही.’’

आ. गुरुदेवांच्या सहवासातील जुन्या आठवणीने त्यांची भावजागृती होते. ते म्हणतात, ‘‘गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्यासाठी किती करते ?’, हे आपण कधीच विसरू शकत नाही.’’

इ. श्री. रामदास यांचा गुरुदेवांप्रती पुष्कळ भोळाभाव असून ते सतत शरणागतभावात असतात.’

– सौ. राधिका रामदास कोकाटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२२)