(म्हणे) ‘भारताकडून चिथावणीखोर शब्दांचा वापर केला जात आहे !’

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या चीनविषयीच्या विधानावरून चीनच्या मुखपत्राचा थयथयाट !

चीन भारताशी आतापर्यंत कसा वागत आला आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे ‘भारताने काय करावे आणि काय करू नये, हे चीनने सांगण्याची आवश्यकता नाही’, अशी समज भारताने चीनला  दिली पाहिजे ! – संपादक

बीजिंग (चीन) – आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारत हा भारत-चीन सीमावादाचा प्रश्न उपस्थित करून तो सोडवण्याचा धोकादायक प्रयत्न करू शकतो. चिनी सरकारने अशा धोकादायक प्रवृत्तींपासून सावध आणि सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. चीनसमवेत संबंध सुधारण्यासाठी तडजोड किंवा वाटाघाटी करण्याची कोणतीही सिद्धता भारताकडून अद्याप दाखवण्यात आलेली नाही. त्याऐवजी आधीच कमकुवत असलेल्या संबंधांना तडा जाणारे आणि संघर्ष अधिक तीव्र करणार्‍या चिथावणीखोर शब्दांचा वापर भारताकडून केला जात आहे, असा थयथयाट चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने केला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी जर्मनीतील म्युनिच येथील सुरक्षा परिषदेमध्ये चीनविषयी बोलतांना ‘भारताचे चीनसमवेतचे संबंध अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहेत. चीनकडून सीमा कराराचे उल्लंघन करण्यात आले आहे’, असे म्हटले होते. त्यावर ‘ग्लोबल टाइम्स’कडून हा थयथयाट करण्यात आला.

१. या दैनिकात पुढे म्हटले आहे, ‘कोणत्याही २ देशांच्या द्विपक्षीय सूत्रांवर त्या २ पक्षांतच चर्चा व्हायला हवी, जिथे दोन्ही पक्ष त्यांच्या प्रमुख समस्या आणि मागण्या थेट मांडू शकतात. द्विपक्षीय वाद सोडवण्याचा हा सर्वांत सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.’

२. चीनमधील ‘एशिया-पॅसिफिक स्टडीज्’ या विभागाचे प्रमुख लॅन जियान्झू यांच्या म्हणण्यानुसार, ‘चीनसमवेत सीमावादाचे द्विपक्षीय प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनसमवेतच्या सीमावादाचा प्रश्न उपस्थित करून भारताकडून अमेरिकेचे त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.’