सातारा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नातीकडून शिवप्रभूंच्या आरतीचे गायन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात विनता जोशी (मध्यभागी) यांच्या समवेत हिंदु महासभेचे पदाधिकारी

सातारा, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – १९ फेब्रुवारी या दिवशी हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवप्रभूंची महाआरती पार पडली. ही आरती स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात विनता जोशी यांनी स्वत: गायली. विशेष म्हणजे या आरतीची रचना स्वत: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केली आहे.

मी स्वत:ला भाग्यवान समजते ! – विनता जोशी, स्वा. सावरकर यांची नात

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असण्याचे भाग्य मला लाभले; परंतु आज शिवछत्रपतींचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते महाआरती होत असताना स्वा. सावरकर यांनी रचलेली आरती मला गाण्याची संधी मिळणे, हा दुर्मिळ दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. मी स्वत:ला भाग्यवान समजते.

हिंदु महासभेच्या वतीने विनता जोशी यांचा सत्कार

स्वा. सावरकर यांची नात विनता जोशी यांचा सातारा हिंदु महासभेच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्वा. सावरकर संस्थापित आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीत हिंदु महासभेच्या वतीने सत्कार झाल्याने विनता जोशी भारावून गेल्या.