हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि स्वरक्षण प्रात्यक्षिके !
कळंबोली – येथील ‘गौरव क्लासेस’चे संचालक श्री. संतोष वर्तक (सर) यांच्या वतीने १९ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ वाजता शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेश परिधान करून मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रारंभी श्री. संतोष वर्तक आणि सनातन संस्थेच्या साधकांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर महाराजांची आरती, पाळणा गीत आणि नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये विद्यार्थांनी शिवाजी महाराजांवर व्याख्याने सादर केली, तसेच पोवाडेही गायले. येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचा गौरवशाली इतिहास सांगणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. या कार्यक्रमाला ४२५ हून अधिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. समितीचे श्री. अमोल पालेकर यांनी समाजात होणारे अपप्रकार आणि त्याला सामोरे जाण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वतः सक्षम होणे कसे आवश्यक आहे ? हे सांगितले. शेवटी समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवली.
श्री. संतोष वर्तक (सर) यांनी विद्यार्थ्यांना स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती. ‘‘मुलींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, तसेच विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक व्यक्तीमत्त्व विकास व्हायला हवा’’, असे ते या वेळी म्हणाले. प्रात्यक्षिके पाहून अनेक विद्यार्थ्यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याची इच्छा व्यक्त केली.