अमेरिकेकडून मिळणार्‍या आर्थिक साहाय्याला नेपाळी जनतेचा विरोध

अमेरिका चीनचा शत्रू असल्याने चीनची फूस असल्यामुळे नेपाळकडून विरोध करण्यात येत आहे का ? याचा शोध अमेरिका घेेणार का ? – संपादक

काठमांडू (नेपाळ) – अमेरिकेच्या सरकारची साहकारी संस्था असलेल्या ‘दी मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन’ (एम्.सी.सी.) हिने वर्ष २०१७ मध्ये नेपाळमधील पायाभूत प्रकल्पांसाठी अब्जावधी रुपयांच्या अनुदानास संमती दिली आहे. यात ३०० किलोमीटर लांबीची वीजवहन यंत्रणा आणि रस्ते सुधार प्रकल्प यांचा समावेश आहे. ही योजना नेपाळी संसदेत संमतीसाठी २० फेब्रुवारी २०२२ या दिवशी सादर करण्यात आली. या पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीच्या योजनांना नेपाळी जनतेचा विरोध आहे. या योजनांना विरोध करण्यासाठी काठमांडूत जमलेल्या निदर्शकांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले, तसेच अश्रुधूरही सोडला. या वेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत काही आंदोलक घायाळ झाले.

१. नेपाळच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे आर्थिक साहाय्य अनुदानाच्या रूपात असल्याने त्याची परतफेड केली जाणार नाही, तसेच अन्य कोणत्याही अटी घालण्यात आलेल्या नाहीत.

२. विरोधकांनी मात्र ‘या करारामुळे नेपाळचे सार्वभौमत्व आणि कायदा याला बाधा पोचेल; कारण या प्रकल्पांचे निर्णय घेणार्‍या मंडळावर लोकप्रतिनिधींची देखरेख असणार नाही’, असा आक्षेप घेतला आहे.

३. नेपाळमधील अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे की, ही योजना म्हणजे अमेरिकी लोकांची नेपाळसाठी भेट आहे.