यंत्रांची प्रगती, मनुष्याची अधोगती !

सध्या सर्वत्र ‘विज्ञानाने किती प्रगती केली’, ‘किती अत्याधुनिक यंत्रे निर्माण केली’, याचा गवगवा केला जात आहे. वैज्ञानिक प्रगतीमुळे यंत्रांची प्रगती झाली असली, तरी मनुष्याची मात्र अधोगती झाल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी घड्याळे नव्हती. तेव्हा तिथी, आकाशातील चंद्र-तारे पाहून वेळेचा अंदाज बांधला जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी ‘अमुक प्रहरी एकत्र जमायचे’, अशा संदेशांची देवाण-घेवाण होऊन मावळे नियोजित वेळी ठरलेल्या ठिकाणी एकत्र जमायचे आणि पुढे मोहिमेवर जाऊन शत्रूची दाणादाण उडवायचे. आज मात्र अगदी ‘मायक्रोसेकंद’ दर्शवणारी घड्याळे उपलब्ध असली, तरी त्याच्याकडून दिलेली वेळ सहसा पाळली जात नाही, ही वस्तूस्थिती आहे. आज दूरच्या व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी अत्याधुनिक ‘स्मार्ट फोन’ उपलब्ध आहेत; पण माणसा-माणसांमधील प्रत्यक्ष संवाद न्यून होत आहे. संगणकावर टंकलेखन करतांना मनुष्य चांगल्या हस्ताक्षराचे वळण विसरून गेला आहे. गणकयंत्रामुळे (कॅल्क्युलेटर) मुले पाढे आणि साधी-सोपी गणिते विसरत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहने, उद्वाहक (लिफ्ट) यांसारख्या यंत्रांमुळे मनुष्याची कार्यक्षमता, शारीरिक क्षमता न्यून झाली आहे. आज माणूस चंद्रावर, मंगळावर पाऊल ठेवत आहे; पण पृथ्वीवर कसे रहायचे ? याचे भान विसरत चालला आहे. यंत्रांमुळे मनुष्याचे श्रम आणि वेळ यांची बचत झाली असली, तरी वाचलेली ऊर्जा अन् वेळ कुठे उपयोगात आणायची ? याचा विवेक राहिला नसल्यामुळे ही ऊर्जा अन् वेळ सहसा वायाच जातो. केवळ युवा पिढीच नाही, तर आजची बालपिढीही ‘इलेक्ट्रॉनिक’ उपकरणांच्या अधीन झाली आहे. इंग्रजीमध्ये याला ‘स्मार्ट’ (हुशार) म्हटले जात असले, तरी हा ‘स्मार्टनेस’ आहे कि भविष्यातील निकामीपणाचा आरंभ ? याचे प्रत्येकाने चिंतन करायला हवे.

यंत्रांच्या अतीवापरामुळे मानवी जीवनात यांत्रिकपणा आला आहे आणि नैसर्गिकपणा, ओलावा न्यून झाला आहे. तो अल्प करण्यासाठी यंत्रांवरील अवलंबित्व जाणीवपूर्वक न्यून करायला हवे. अनेक संतांनीही आगामी आपत्काळाचा वेध घेत ‘भविष्यात यंत्रे ठप्प होऊ शकतात’, असे सांगितले आहे. असा काळ आला, तर त्याचा सामना करण्यासाठी आपण सिद्ध आहोत का ? त्या दृष्टीनेही आतापासूनच सिद्धता करायला हवी. यंत्र वापरण्याचे तंत्र जमले नाही, तर जीव परतंत्र म्हणजे यंत्रांच्या अधीन होण्याची शक्यता आहे, हे यातील लक्षात घ्यायचे सूत्र !

– सौ. गौरी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.