ठाणे, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – ठाणे ते दिवा या मध्य रेल्वेवरील ५ व्या आणि ६ व्या नव्या मार्गिकेला १८ फेब्रुवारी यादिवशी दुपारी ४.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवा कंदील दाखवला. या वेळी संबोधित करतांना पंतप्रधान मोदी यांनी प्रवाशांचे अभिनंदन केले. या मार्गिकांमुळे आता रेल्वेप्रवास अधिक जलदगतीने होणार असून मध्य रेल्वे मार्गावर ३६ नव्या लोकल गाड्या चालू होत असल्याची घोषणा त्यांनी केली, तर काही वर्षांत ४०० ‘वन्दे भारत ट्रेन’ चालू करणार असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुंबई आणि परिसरात रेल्वेचा विकास आणि आधुनिकीकरण करण्याच्या योजना रेल्वे मंत्रालयाने हाती घेतल्याच आहेत, मात्र केवळ मुंबईतच नाही, तर देशातील इतर राज्यांमधून येणार्या रेल्वे गाड्या जोडणीला (कनेक्टिव्हिटीला) जलद गतीची आवश्यकता आहे. ‘अहमदाबाद- मुंबई हायस्पीड’ रेल्वे प्रकल्प मुंबईच्या क्षमतेला स्वप्नातील शहराच्या रूपात मुंबईची ओळख सशक्त करेल.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते, तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
रेल्वे रुळांजवळील एकाही झोपडपट्टीधारकावर अन्याय होणार नाही राज्यशासन आणि रेल्वे यांच्यात समन्वय साधून येथील रहिवाशांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वेळी दिले.