रामनाथी, गोवा – साधनेसाठी उच्चभ्रू जीवनशैली त्यागून आश्रमजीवन अंगीकारणारे आणि गेले काही मास दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) निकामी झाली असल्याने तीव्र शारीरिक त्रास भोगत असूनही प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘देह प्रारब्धावरी सोडा । चित्त (अंतर्मन) चैतन्याशी जोडा ।’ या भजनपंक्तीप्रमाणे अखंड अनुसंधानात राहून आनंद अनुभवणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात इंग्रजी भाषांतराची सेवा करणारे साधक श्री. शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे) यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता एका सत्संगात घोषित करण्यात आली. ९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली. १८.२.२०२२ या दिवशीच्या दैनिकात आपण या सत्संग सोहळ्याच्या वृत्ताचा काही भाग पाहिला. आजच्या उर्वरित भागात श्री. शिरीष देशमुख यांनी या सोहळ्यात साधनेविषयी व्यक्त केलेले विचार, तसेच त्यांची सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया.
मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/554100.html
३. श्री. शिरीष देशमुख यांनी त्यांच्या साधनेविषयी व्यक्त केलेले विचार
३ अ. भगवंताशी अनुसंधान साधण्याविषयीचे विचार
१. माझी साधना थोडी ज्ञानयोगाकडे वळलेली आहे. त्यामुळे ‘मी देह नाही, तर आत्माच आहे’, अशी मला जाणीव आहे. त्याचा ब्रह्माशी संवाद चालू असतो. त्यामुळे वैश्विक (ईश्वराचे) विचार येतात.
२. आपण अनुसंधानात असतो, तेव्हा आपण स्वतःशी बोलतो. आत्म्याशी बोललो की, ईश्वराशीच बोलल्याप्रमाणे जाणवते. त्या वेळी कधी कशाची चिंता वाटली, तर स्वतःचा आत्मा म्हणजे ईश्वरच मला सांगतो की, तोच सर्व काही बघेल. त्यामुळे आलेला विचार निघून जातो. अशा प्रकारे अनुसंधानात राहिल्यामुळे स्वतःमध्ये पुष्कळ पालट झाल्याचे जाणवते.
३. ‘खरेतर मी देवासाठी काही करत नाही, तरी देव माझ्यासाठी एवढे का करतो ?’, असा विचार मनात येतो.
३ आ. कठीण प्रसंगांत सकारात्मक ठेवणारे विचार
१. पैशांची किंवा अन्य कशाचीही चिंता वाटत नाही; कारण ‘देवच सर्व बघतो’, अशी माझी श्रद्धा आहे. वर्ष २०१३ मध्ये पूर्णवेळ साधना करू लागल्यापासून मला असे सतत जाणवते. माझ्यावर अनेकदा जीवघेणे प्रसंग आले; पण देवाने मला प्रत्येक वेळी त्यातून तारून नेले. मी प्रत्येक गोष्टीतील सकारात्मक भागाचे अवलोकन करतो. ‘ईश्वराचे माझ्याकडे लक्ष आहे’, हे अनेक प्रसंगांतून माझ्या मनावर कोरले गेले. आपण केवळ सर्वकाही ईश्वरचरणी अर्पण करायचे आणि त्याच्यावर सोपवायचे.
२. ‘आता प्रारब्धानुसार ज्या शारीरिक आजारांना तोंड देत आहे, ते मागच्या काही जन्मांतील फेडत आहोत’, असे वाटते. या सर्वांमुळे मला मृत्यूचे भय वाटत नाही.
३ इ. साधक आणि आश्रम यांविषयीचे विचार
१. ‘माझ्यामुळे कुणाला त्रास व्हायला नको’, असे मला वाटते. मी जरी रुग्णाईत असलो, तरी ‘अन्य साधकांचा वेळ मला साहाय्य करण्यात जाऊ नये. तो वेळ साधकांना समष्टी सेवेसाठी देता यावा’, असे मला वाटते. साधकांनी माझी सेवा करण्यापेक्षा गुरुसेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे मी जमेल तेवढ्या स्वतःच्या गोष्टी स्वतः करतो. ‘माझा देह केवळ देवाच्या चरणी अर्पण व्हावा’, असे वाटते. सेवेतूनच माझी देहबुद्धी न्यून झाली आहे ना !
२. मी जेव्हा पुष्कळ रुग्णाईत होतो, तेव्हा माझा भाऊ, सून आदी कुटुंबीय मला पनवेलला त्यांच्या घरी रहाण्याविषयी सांगत होते. ‘आम्ही तुमची काळजी घेऊ’, असे ते म्हणाले. मी त्यांना सांगितले, ‘‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाण्यास जायचे आहे.’’ माझ्या कुटुंबापेक्षा मला गुरु, साधक आणि सनातनचा आश्रम यांचा आधार मोठा आहे.
३ ई. ‘मी कुणाच्याही भूतकाळाकडे पहात नाही’, या प.पू. भक्तराज महाराज यांच्या वचनाप्रमाणे आचरण !
१. वर्तमानात राहून शिकण्याचा प्रयत्न करतो ! : ज्याप्रमाणे प.पू. भक्तराज महाराज साधकांच्या भूतकाळाकडे न बघता वर्तमानकाळाकडे बघत असत, तसे बघण्याचा मी प्रयत्न करतो. ‘प्रतिदिन चुकांमधून काय शिकायला मिळाले ? विवेक कुठे न्यून पडला ?’ हे अंतर्मुखता ठेवून शिकल्याने मनावर त्याविषयीचा संस्कार कोरता येतो. अध्यात्माच्या मार्गावर असल्याने गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधनेचे प्रयत्न करतो. माझे कुणीही शत्रू नाहीत. मी कुणाचे कधीही वाईट चिंतत नाही. एखादा प्रसंग घडला, तरी मला त्याचा मनाच्या स्तरावर त्रास होत नाही. त्यामुळे मी निराशेत जात नाही. ‘माझी आध्यात्मिक पातळी कधी वाढेल ?’, याचा विचार करत नाही.
२. ‘भविष्यात काय घडणार आहे ?’, ते ठाऊक नसल्यामुळे जे होणार, ते ईश्वरावर सोडून आताचा आणि पुढे येणारा क्षण यांतून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर मोठ्या आजारपणातही सकारात्मक आणि आनंदी रहाणारे श्री. शिरीष देशमुख !
४ अ. दोन्ही मूत्रपिंडे निकामी होऊनही आजाराला सामोरे जाण्याची सिद्धता ठेवून मनाने आनंदी रहाणे : ‘श्री. देशमुखकाकांची दोन्ही मूत्रपिंडे (किडनी, kidney) निकामी झाल्याचा अहवाल आल्याचे कळले. त्यामुळे मी देशमुखकाकांना भेटायला गेले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘माझी मूत्रपिंडे निकामी झाली; म्हणून काळजी करू नको. माझ्या मनाची त्याला सामोरे जाण्याची सिद्धता झाली आहे. मला आजाराचे काही वाटत नाही. सर्वकाही परात्पर गुरुदेवांवर सोपवले आहे. आजार देहाला झालेला असल्यामुळे मी मनाने आनंदी आहे.’’ (हे वाक्य ऐकल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘असे म्हणणारे काकाच एकमेव आहेत. ही परात्पर गुरुदेवांवरील श्रद्धेची किमया आहे.’’)
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (इंग्रजी भाषांतराची सेवा करणार्या साधिका) (९.२.२०२२)
४ आ. ‘डायलिसिस’सारख्या वेदनादायी उपचारांनाही सहजतेने आणि आनंदाने सामोरे जाणे : ‘मला ‘डायलिसिस’ (टीप) म्हणजे काय ? ते ठाऊक नव्हते. त्यामुळे मी एक दिवस श्री. देशमुखकाकांकडून ती प्रक्रिया जाणून घेतली. त्या वेळी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. एकदा त्यांचे ‘डायलिसिस’ असतांना मी त्यांना सोबत म्हणून रुग्णालयात गेलो होतो. ते उपचार झाल्यानंतर मला म्हणाले, ‘‘जसे एखादा लहान मुलगा डोक्यावरचे केस कापण्यासाठी जातो, तशी प्रक्रिया आहे.’’ त्या वेळी ते मनाने पुष्कळ आनंदी होते.’
– श्री. अरविंद ठक्कर, फोंडा (इंग्रजी भाषांतराची सेवा करणारे साधक) (९.२.२०२२)
(टीप : ‘डायलिसिस’ (dialysis) म्हणजे रुग्णाच्या मूत्रपिंडांनी नीट काम करणे थांबवल्यावर रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत रक्त शुद्ध करण्यासाठी अनेकदा यंत्राचा वापर केला जातो.)
५. श्री. शिरीष देशमुख यांना आलेली अनुभूती !
५ अ. रेल्वेप्रवास करतांना अस्वस्थ वाटू लागल्याने मधल्या स्थानकावर उतरावे लागणे, त्या वेळी अनोळखी व्यक्तीने प्राथमिक उपचार देणे, महत्त्वाच्या कागदपत्रांची पिशवी मिळवून देण्यासह सर्व साहाय्य करणे : ‘वर्ष २०२१ मध्ये मी रेल्वेने ठाणे येथे जात होतो. तेव्हा प्रवासात असतांना मला कल्याण स्थानकावरच अस्वस्थ वाटू लागल्याने मी तेथे उतरलो. त्या वेळी मी माझी १ ‘बॅग’ घेतली; मात्र महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी (बॅग) मी रेल्वेमध्येच विसरलो. रेल्वेस्थानकावर उतरल्यावर अस्वस्थ वाटत असतांना माझ्याजवळ दळवी आडनावाची एक अनोळखी व्यक्ती आली. त्या व्यक्तीने माझी चौकशी करून मला प्राथमिक उपचार देण्याची व्यवस्था केली. तसेच बोगीत राहिलेली बॅग मिळवण्यासाठी दळवी यांनी रेल्वेच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. विशेष म्हणजे ठाणे येथील रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत बोगीत राहिलेली बॅग परत मिळवली. दळवी नावाच्या त्या व्यक्तीने शेवटी मला ठाण्याला जाण्यासाठी एका प्रवासी चारचाकी वाहनात बसवून दिले. ज्याप्रमाणे साधकांना अडचणीच्या वेळी कोणाच्या तरी माध्यमातून प.पू. भक्तराज महाराज साहाय्य करत असल्याची अनुभूती येते, तशीच ही मोठी अनुभूती मला देवाच्या कृपेने आली.’
– श्री. शिरीष देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.२.२०२२)
उच्चभ्रू जीवनशैली त्यागून साधनेचे प्रयत्न तळमळीने करणारे श्री. शिरीष देशमुखकाका !१. गत २-३ मासांपासून श्री. शिरीष देशमुख यांच्यामध्ये पुष्कळ पालट जाणवणे आणि त्यांच्याशी बोलतांना ‘निरागस बाळाशी संवाद साधत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे श्री. देशमुखकाकांना मी संभाजीनगर येथे असल्यापासून म्हणजे साधारण २० वर्षांपासून ओळखते. तेव्हाचे काका, तसेच साधारण एक-दीड वर्षांपूर्वीची काकांची स्थिती आणि या दोन-तीन मासांतील काकांची स्थिती यांत पुष्कळ पालट आहे. साधारण २ आठवड्यांपूर्वी मी श्री. देशमुखकाकांशी बोलत असतांना त्यांचा तोंडवळा मला लहान मुलाप्रमाणे जाणवला. त्यांच्याशी बोलतांना ‘मी एका निरागस बाळाशी संवाद साधत आहे’, असे जाणवून माझी भावजागृती होत होती. २. ‘श्री. देशमुख यांनी उच्चभ्रू जीवनशैली सोडून साधना अंगीकारणे’, हे पुष्कळ मोठे साध्य आहे’, असे त्यांचे मित्र श्री. सत्यनारायण तिवारी यांना वाटणे माझे वडील श्री. सत्यनारायण तिवारी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि श्री. देशमुखकाका हे दोघे जुने मित्र आहेत. देशमुखकाका साधनेत आल्यानंतर माझ्या वडिलांना पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण काकांचा सामाजिक स्तरावरचा संपर्क मोठा आहे. त्यांची जीवनशैलीही उच्चभ्रू आहे. सर्व सुखसोयी, नोकर-चाकर यांच्या सहवासात राजासारखे जीवन जगत असलेली व्यक्ती साधनेत वळली, हे पाहून माझे बाबा म्हणाले, ‘‘देशमुखसाहेब साधनेमध्ये आले, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे.’’ जेव्हा श्री. देशमुखकाका पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहायला आले, तेव्हा बाबांना पुन्हा आश्चर्य वाटले; कारण ‘आपल्याला हव्या तशा वातावरणात साधना करणे आणि आश्रमजीवनाशी समरस होणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत’, असे बाबांना वाटायचे. ते श्री. देशमुखकाकांनी स्वीकारले, याचे माझ्या वडिलांना आश्चर्य वाटले. ३. एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले सोहळ्यात साधकांकडून झालेल्या चुका सांगत असतांना श्री. देशमुखकाकांनी त्यांच्या चरणाशी बसून ‘चुका सांगा; पण आम्हाला सोडू नका’, असे त्यांना सांगणे अनुमाने वर्ष २००० मध्ये परात्पर गुरुदेव डॉ. आठवले संभाजीनगर येथे आले असतांना त्या वेळी झालेल्या एका सोहळ्यात काही चुका झाल्या होत्या. तेव्हा परात्पर गुरुदेव त्याविषयी सुधारणा सांगत होते. त्या वेळी श्री. देशमुखकाका त्यांच्या चरणांशीच बसले होते. ते म्हणाले, ‘‘तुम्ही आम्हाला चुका सांगा, रागवा; पण आम्हाला सोडू नका.’’ ते परात्पर गुरुदेवांच्या चरणी क्षमायाचना करत होते. तेव्हा मी नुकतीच श्री. देशमुखकाकांच्या संपर्कात आले होते, तसेच पहिल्यांदाच परात्पर गुरुदेवांना पहात होते. काकांचा परात्पर गुरुदेवांप्रतीचा तो भाव पाहून माझी भावजागृती झाली होती आणि आजही तो प्रसंग अन् ते दृश्य आठवले की, भावजागृती होते. त्या प्रसंगात मला त्यांचा परात्पर गुरुदेवांविषयीचा भाव अनुभवता आला.’ – होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी, भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.२.२०२२) |
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |