श्री विठ्ठल-रुक्मिणीचे अलंकार वितळवण्यास शासनाची अनुमती !

  • १९ किलो ८२४ ग्रॅम २५६ मिली सोने आणि ४२५ किलो ८७७ ग्रॅम ६४४ मिली चांदी वितळवणार

  • वजन प्रक्रियेचे होणार अखंडित चित्रीकरण

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठल मंदिरात भाविकांनी वर्ष १९८५ ते २०१९ या कालावधीत देणगीरूपाने आणि दक्षिणा पेटीमध्ये टाकलेले सोने अन् चांदी यांचे अलंकार वितळवण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे. श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेस भक्तांकडून देणगीच्या स्वरूपात अर्पण केलेले १९ किलो ८२४ ग्रॅम २५६ मिली सोने आणि ४२५ किलो ८७७ ग्रॅम ६४४ मिली चांदी वितळवण्यात येणार आहे. अलंकार आणि वस्तूच्या वजन प्रक्रियेचे अखंडित चित्रीकरण होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

१. नवीन भक्तनिवास येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे सोने आणि चांदीचे अलंकार वितळवण्याविषयी बैठक घेण्यात आली. या बैठकीस मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, विधी आणि न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कर्‍हाळे, मंदिर समितीचे समितीचे सदस्य डॉ. दिनेश कुमार कदम, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक संजीव गोसावी उपस्थित होते.

२. अलंकारपैकी जे अलंकार असामान्य कलाकुसरीचे, तसेच पुरातन आणि दुर्मिळ असतील, त्याचसमवेत जे अलंकार उत्सवावेळी देवासाठी वापरले जातात, असे अलंकार जतन करून ठेवण्यात येणार असल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. सोन्या-चांदीचे दागिने वितळवून त्यांच्या विटा सिद्ध करणे, विटा बँकेत ठेव स्वरूपात ठेवणे, विक्री करणे, तसेच नवीन अलंकार सिद्ध करणे, अशा पद्धतीने शासनाने अनुमती दिली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.