जी.ए. सॉफ्टवेअरचे संस्थापक गणेशन् यांना अश्विनकुमार यांनी दिले २ कोटी रुपये !

शिक्षक पात्रता परीक्षा अपव्यवहार प्रकरण

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र करणारे संचालक अश्विनीकुमार यांनी जी.ए. सॉफ्टवेअरचे संस्थापक गणेशन यांना २ कोटी रुपये दिल्याचे पोलिसांना सांगितले आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर यांची गणेशन् यांनी ३ वेळा भेट घेतली होती. खोडवेकर यांच्याकडे परीक्षांसंबंधी काहीही अधिकार नसतांना ते खोडवेकर यांना कशासाठी भेटले ? याचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. जी.ए. सॉफ्टवेअरला काळ्या सूचीतून काढण्यासाठीच सुपे यांच्यावर दबाव आणण्यासाठीच ही भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अश्विनकुमार यांच्या घराची झडती घेतली तेव्हा पोलिसांनी १ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, हिरे, जडजवाहीर आणि चांदीच्या वस्तू जप्त केल्या होत्या.

यावर पोलिसांनी गणेशन् यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असून अश्विनकुमार यांनी त्यांना पैसे दिल्याचे नाकारले आहे. तसेच मला महाराष्ट्रात अशा प्रकारे परीक्षेत अपव्यवहार होत असल्याची कल्पना नसल्याचा दावा त्यांनी पोलिसांपुढे केला आहे.

राज्य शिक्षण परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी सुशील खोडवेकर यांच्या दबावामुळे जी.ए. सॉफ्टवेअरला काळ्या सूचीतून काढले होते. राज्य शिक्षण परिषदेच्या इतर सदस्यांचा काळ्या सूचीतून जी.ए. सॉफ्टवेअरला बाहेर काढण्यास विरोध होता. सुपे यांनी त्यांचा अध्यक्षीय अधिकार वापरला होता.