महाराष्ट्रात हिजाबला समर्थन असल्याचे दाखवण्यासाठी दैनिक ‘लोकसत्ता’कडून कर्नाटकमधील छायाचित्र वापरून दिशाभूल !

  • चुकीची माहिती देणारी पत्रकारिता समाजहित काय साधणार ? हा हिंदुविरोधी अजेंडा राबवण्याचा प्रकार आहे का ? याची चौकशी व्हायला हवी ! – संपादक 
  • समाजाची दिशाभूल करणारी प्रसारमाध्यमे ही लोकशाही व्यवस्थेला मारक ! – संपादक 
‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे छायाचित्र

मुंबई, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – दैनिक ‘लोकसत्ता’चे संकेतस्थळ आणि छापील अंकात १३ फेब्रुवारी या दिवशी ‘हिजाबचे राज्यभर धर्मातीत समर्थन; विरोधानंतर वापर आणि मागणीत वाढ, महिला हक्काचा आग्रह’, या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वृत्तामध्ये हिजाबला समर्थन मिळत असल्याचे दाखवण्यासाठी चक्क हिंदुत्वनिष्ठ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उभे असलेले छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. याहून धक्कादायक प्रकार म्हणजे या वृत्तामध्ये महाराष्ट्रात हिंदु विद्यार्थ्यांकडून हिजाबचे समर्थन करण्यात येत असल्याचे दाखवण्यासाठी कर्नाटकमधील छायाचित्र वापरून दिशाभूल करण्यात आली आहे. ‘या वृत्तामध्ये घेण्यात आलेले छायाचित्र नेमके कुठले आहे ?’ याचा संदर्भही देण्यात आलेला नाही. गूगलवर या छायाचित्राचा शोध घेतल्यावर हे छायाचित्र कर्नाटकमधील असल्याचे आढळून आले.

१. या वृत्तामध्ये ‘तुरळक स्वरूपात हिंदु मुली या मुसलमान विद्यार्थिनींच्या समर्थनार्थ उभ्या रहात आहेत’, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात हिजाबला विरोध करणार्‍या विद्यार्थ्यांचे चित्र वृत्तात घेण्यात आले आहे. त्यामध्ये बहुसंख्य हिंदु विद्यार्थी आहेत. यावरून बातमी वाचणार्‍याला छायाचित्रातील भगवी वस्त्रे परिधान केलेले हिंदु विद्यार्थी हिजाबच्या समर्थनासाठी आले आहेत, अशा पद्धतीने या वृत्तात हे छायाचित्र जाणीवपूर्वक देण्यात आल्याचे वृत्तावरून दिसून येते, असे हिंदूंचे म्हणणे आहे.

२. या वृत्तामध्ये ‘विद्यार्थिनींनी त्यांच्या धर्मानुसार किंवा आवडीनुसार पोषाख घालत असतील, तर त्यावर कुणीच आक्षेप घेऊ नये, असे मत मुंबईतील विद्यार्थिनीने व्यक्त केल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारे पुणे येथील एका विद्यार्थिनीचे हिजाबचे समर्थन करणारी प्रतिक्रिया वृत्तामध्ये दिली आहे. मुंबईतील एका विद्यार्थिनीची प्रतिक्रिया देतांना ‘मला छान नक्षीदार हिजाब आवडतात’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

३. या सर्व प्रतिक्रिया देतांना एकाही विद्यार्थीनीचे किंवा ‘ती विद्यार्थी कोणत्या महाविद्यालयातील आहे ?’, त्या महाविद्यालयाचेही नाव देण्यात आलेले नाही, तसेच प्रतिक्रिया देणारी विद्यार्थीनी हिंदू आहे कि मुसलमान यांचाही उल्लेख नाही.

४. या वृत्तामध्ये ‘हिजाब वापरणे अथवा नाकारणे हे स्त्रीचे स्वातंत्र्य किंवा तिच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. केवळ हिजाब वापरल्यामुळे मुलींच्या शिक्षणात अडथळे निर्माण केले जात असतील, तर आम्हीही हिजाब घालून महाविद्यालयांत जाऊ, अशी चर्चा महाविद्यालयीन तरुणी सामाजिक माध्यमांवर करतांना दिसत आहे’, असे मोघम लिखाण करण्यात आले आहे.

५. मुंबई, पुणे, संभाजीनगर यांसह विविध भागांतील महिला आणि विद्यार्थिनी मुसलमान महिलांना पाठिंबा दर्शवत आहेत, असे वृत्तांमध्ये म्हटले आहे; मात्र नेमका कोणत्या भागात पाठिंबा देण्यात आला आहे ? याची कोणतीही माहिती अथवा छायाचित्र वृत्तात देण्यात आलेले नाही. एकूण या वृत्तामध्ये हिजाबला हिंदु विद्यार्थिनींचा पाठिंबा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.