साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणारे आणि साधकांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देऊन साधनेत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्नरत असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘सद्गुरु राजेंद्रदादांचा व्यष्टी साधनेचा आढावा आणि आढाव्यातील साधक यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अन् ते साधकांना कशा प्रकारे साहाय्य करतात’, हे पाहिले.

https://sanatanprabhat.org/marathi/552012.html

आजच्या उर्वरित लेखात आपण ‘ते साधकांवर व्यष्टी साधनेचे महत्त्व कसे बिंबवून साधकांना टप्प्याटप्प्याने पुढे कसे नेतात ?’ आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पाहूया.

वैद्या (कु.) माया पाटील

५. साधकांना टप्प्याटप्प्याने पुढे नेणे

‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया ही लगेच होणारी प्रक्रिया नाही’, हे लक्षात घेऊन ते साधकाला टप्प्याटप्प्याने पुढे नेतात. यामध्ये प्रथम ते तीव्र स्वभावदोष किंवा अहं यांची तीव्रता अल्प करण्यावर भर देण्यास सांगतात. त्यानंतर गुणसंवर्धन आणि भावजागृती यांसाठी प्रयत्न करण्यास सांगतात. त्यामुळे साधकालाही तसे करणे सोपे जाते. सर्व गोष्टी एकाच वेळी करायचा प्रयत्न केल्यास ते जमत नाही आणि ताण येतो.

६. ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकावी लागते’, असे सद्गुरु राजेंद्रदादांनी साधकांना समजावून सांगितल्यामुळे साधकांना प्रक्रियेचा ताण न येणे

सद्गुरु राजेंद्रदादा सर्वप्रथम ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया ही शिकण्याची गोष्ट आहे’, हे साधकांच्या मनावर बिंबवतात अन् ‘या प्रक्रियेतील प्रत्येक बारकावा मला शिकायचा आहे’, या स्थितीला नेतात. त्यामुळे साधकांना ताण येत नाही किंवा ते ‘मला काही येत नाही’, अशा नकारात्मक विचारांमध्ये जात नाहीत.

७. ‘स्वभावदोष अनेक जन्मांचे असल्यामुळे त्यांचे संपूर्ण निर्मूलन होणे’, ही दीर्घकालीन प्रक्रिया असल्यामुळे सद्गुरु राजेंद्रदादा स्वभावदोषांमध्ये होत असलेल्या पालटांकडे सकारात्मकतेने पहाण्याची दृष्टी देऊन साधकाला प्रक्रिया करण्यासाठी प्रोत्साहन देत असणे

आढावा चालू झाल्यानंतर ‘साधकामध्ये पालट होत आहे कि नाही ?’ याकडे सद्गुरु राजेंद्रदादा लक्ष देतात. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करतांना साधकातील एखादा स्वभावदोष लगेच गेला, असे होत नाही; पण वेगवेगळ्या अंगांनी साधकामध्ये पालट दिसतात, उदा. नकारात्मकता दूर होणे, प्रयत्नांमध्ये उत्साह येणे, प्रसंगांकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होणे, प्रक्रियेतील गती वाढणे, ताण दूर होणे इत्यादी. बर्‍याचदा साधक या दृष्टीने स्वतःचे निरीक्षण करत नाहीत. साधक ‘स्वतःतील स्वभावदोष किती अल्प झाले ?’, अशा एकाच अंगाने निरीक्षण करतात. त्यामुळे साधकाला ‘माझ्यात काहीच पालट होत नाही’, असे वाटते. स्वभावदोष पूर्ण जाण्याची प्रक्रिया दीर्घकालीन आणि साधकाच्या प्रयत्नांच्या चिकाटीवर अवलंबून आहे. प्रक्रिया राबवतांना साधकांमध्ये काहीना काही पालट होत असतोच. त्या दृष्टीने सद्गुरु राजेंद्रदादा साधकाला पहाण्यास शिकवून प्रक्रियेतील त्याचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवतात.

सद्गुरु राजेंद्रदादांची साधकांकडे बघण्याची दृष्टी पुष्कळ सकारात्मक आणि व्यापक आहे. त्यामुळे साधकांचाही प्रक्रिया करण्यातील उत्साह वाढतो.

८. व्यष्टी साधनेचे महत्त्व बिंबवणे

ईश्वरप्राप्ती करतांना ‘स्वतःमध्ये पालट होणे’, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कितीही सेवा केली, तरी स्वतःमध्ये पालट झाले नाहीत, तर आपण ईश्वरप्राप्तीच्या दिशेने पुढे जात नाही. त्यामुळे ते साधकांच्या मनावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांनी व्यष्टी साधना चांगली करून आध्यात्मिक प्रगती करणे आवडणार आहे’, हे सतत बिंबवतात. त्यामुळे साधकांना ध्येयाची जाणीव रहाते आणि त्यांच्या प्रयत्नांमधील गती वाढते.

९. सर्वांना सहभागी करून घेणे

व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या गटामध्ये जे साधक असतात, त्या सर्व साधकांना ते आढावा चालू असतांना सहभागी करून घेतात. केवळ तेच दृष्टीकोन देतात किंवा साधकांनी विचारलेल्या अडचणींवर उपाययोजना सांगतात, असे न करता ते सर्व साधकांना त्यात सहभागी करून घेतात. त्यामुळे साधकांचा उत्साह वाढतो. आढाव्यात सर्व जण सतर्क असतात. एखाद्या प्रसंगातील सर्वांची विचारसरणी लक्षात येते. एखाद्या साधकाने चूक सांगितल्यानंतर ‘त्यातील स्वभावदोष आणि स्वयंसूचना योग्य आहेत कि नाहीत ?’, हेही ते सर्वांना विचारतात. यातून साधक सर्व प्रकारे सिद्ध होतो.

१०. साधकाला स्वयंपूर्ण बनवणे

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना ते साधकाला ‘प्रक्रिया कशी करायची ?’, हे शिकवत असल्यामुळे साधक प्रक्रिया शिकून स्वयंपूर्ण बनतो. त्याला ‘चूक लिहिता येत नाही, स्वभावदोष शोधता येत नाहीत किंवा सूचना बनवता येत नाही’, असे होत नाही. त्यामुळे त्याला प्रक्रिया राबवता येते आणि त्यातून आनंदही मिळतो.

११. काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

११ अ. साधकाला प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधणे : साधकाला एखाद्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी ते केवळ तात्त्विक दृष्टीकोन न सांगता ‘नेमकी काय कृती किंवा उपाययोजना करायला हवी ?’ ते सांगून त्यावर भर देतात. त्या उपाययोजनेमुळे ‘साधकाला प्रसंगातून बाहेर पडता येते ना ?’ हे ते त्या साधकाला विचारतात. ‘त्या साधकाला त्या प्रसंगातून बाहेर पडता येत नाही’, याची त्यांना थोडी जरी शंका आली, तरी ते अजून वेगवेगळे पर्याय देतात आणि त्या साधकाला साहाय्य करतात.

११ आ. साधकाची स्थिती नसेल, तर संयमाने घेणे : कधी कधी एखाद्या प्रसंगात साधक ऐकण्याच्या किंवा स्वीकारण्याच्या स्थितीत नसतो. अशा वेळी ते थोडे थांबून तो साधक ऐकण्याच्या स्थितीत आल्यानंतर पुन्हा त्याच्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचा ‘लगेचच आणि आताच सर्व समजायला हवे’, असा अट्टहास नसतो. त्यामुळे साधकाला ताण येत नाही.

११ इ. नवनवीन प्रयोग करणे : ‘साधकांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य रहावे’, यासाठी ते नवनवीन प्रयोग करतात. त्यामुळे साधकांच्या प्रयत्नांमधील उत्साह टिकून रहातो.

११ ई. सद्गुरु राजेंद्रदादा साधकाला प्रक्रिया करण्यासाठी सतत प्रोत्साहित करत असणे : स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करतांना ‘साधक उत्साही कसे रहातील ?’, याचा विचार करून ते त्यांना छोट्या छोट्या कृतींतूनही प्रेरणा देतात. थोड्या थोड्या कालावधीसाठी ते त्यांना छोटी छोटी ध्येये घ्यायला सांगतात, उदा. ‘सण जवळ आला असेल, तर त्या सणापर्यंत कुठले प्रयत्न करणार ?’ किंवा ‘विशिष्ट सेवा असतील, तर या सेवेच्या माध्यमातून कुठले प्रयत्न करणार ?’ किंवा ‘साधक घरी जाणार असेल, तर ‘घरी असतांना प्रक्रियेचे प्रयत्न कसे करणार ?’ अशा प्रकारे विचारून ‘साधकाची प्रक्रिया करण्याची प्रेरणा सतत जागृत राहील’, याकडे ते लक्ष देतात. ते प्रत्येक प्रसंगात साधकाच्या प्रयत्नांकडे लक्ष देतात आणि त्याला प्रोत्साहन देण्याची एकही संधी सोडत नाहीत.

१२. सद्गुरु राजेंद्रदादांमधील चैतन्यामुळे कार्य होत असणे

सद्गुरु राजेंद्रदादांमध्ये असलेल्या चैतन्यामुळे ते सांगत असलेल्या विषयाचे आकलन लगेच होते आणि साधकाच्या अंतर्मनाची प्रक्रिया आपोआप होते अन् साधकांना स्वतःमध्ये पालटही जाणवतो. यामुळे ‘संतच प्रक्रिया करून घेऊ शकतात’, असे मला वाटले. परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) नेहमी म्हणतात, ‘‘चैतन्यानेच कार्य होते. यासाठी साधकांमधील चैतन्य वाढायला हवे, म्हणजेच साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हायला हवी.’’ सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या या आढाव्यामुळे मला ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळते.

१३. सद्गुरु राजेंद्रदादा व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना शिकायला मिळालेली सूत्रे

अ. कुठलीही सेवा करतांना खोलात जाऊन अभ्यास केल्यास साधनेची फलनिष्पत्ती वाढते.

आ. सेवा करतांना सेवेकडे पहाण्याची आपली भूमिका सुस्पष्ट हवी. सेवेकडे बघण्याची भूमिका चुकली, तर पुढील सर्व कृतीही चुकतात.

इ. ‘मी आढावासेवक आहे, म्हणजे मला काहीतरी येते आणि मी आता आढाव्याला येणार्‍या साधकांना शिकवणार’, अशा भूमिकेत गेल्यामुळे आपल्याला ‘आढावा घेणे’ या सेवेचा साधनेच्या दृष्टीने अल्प लाभ होतो.

ई. देवाने मला ही सेवा माझ्या उद्धारासाठी दिली आहे. ‘ही सेवा मी देवाला अपेक्षित अशी चांगली कशी करू ?’, असा विचार करून सेवा केल्यास देव सुचवतो आणि तशी सेवा करवून घेतो. त्यातून त्या सेवेची फलनिष्पत्ती वाढते.

व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना सद्गुरु राजेंद्रदादांना ‘प्रत्येक साधक गुरुदेवांना अपेक्षित असा घडायला हवा’, ही एकच तळमळ असते. त्या अनुषंगाने ‘साधकांना कसे साहाय्य करता येईल ?’, यासाठी ते स्वतःच प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. यासाठी सद्गुरु राजेंद्रदादांच्या चरणी आणि असे संत घडवणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’

– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.९.२०२१)

(समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक