राष्ट्रीय शेअर बाजराच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्णन् यांना ३ कोटी रुपयांचा दंड !

मनमानी कारभार केल्याच्या प्रकरणी, तसेच प्रशासकीय कामकाजातील त्रुटींमुळे ‘सेबी’ने केली कारवाई !

राष्ट्रीय शेअर बाजराच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्णन् (डावीकडे)

नवी देहली – मनमानी कारभार केल्याच्या प्रकरणी, तसेच प्रशासकीय कामकाजातील त्रुटींमुळे ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (‘सेबी’ने) राष्ट्रीय शेअर बाजराच्या (एन्.एस्.ई.च्या) माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्णन् यांना ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, तसेच शेअर बाजारचे ‘ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर’ आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार आनंद  सुब्रह्मण्यम् आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे अन्य अधिकारी यांना प्रत्येकी २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबी ही संस्था देशातील शेअर बाजरावर नियंत्रण ठेवते. चित्रा रामकृष्णन् या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत शेअर बाजाराच्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या.

(म्हणे) हिमालयातील एका ‘योगी’कडून मिळत असलेल्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतले ! – चित्रा रामकृष्णन

चित्रा रामकृष्णन् यांनी हिमालयामध्ये रहणार्‍या एका ‘योगी’च्या सांगण्यावरून आनंद सुब्रह्मण्यम् यांची शेअर बाजारचे ‘ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर’ आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागारपदी नियुक्त केल्याचे म्हटले आहे. ‘सेबी’च्या एका आदेशामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रामकृष्णन् यांनी म्हटले आहे, ‘मी गेल्या २० वर्षांपासून या योगींच्या मार्गदर्शनानुसार काम करत आहे. त्या या योगींना ‘शिरोमणी’ या नावाने संबोधते.’