कॅनडातील ‘फ्रीडम कॉन्वाय’चे लोण आता फ्रान्समध्ये !

राजधानी पॅरिसच्या दिशेने सहस्रावधी ट्रकचालक आणि असंख्य नागरिक यांची आगेकूच !

(टीप : ‘फ्रीडम कॉन्वाय’ म्हणजे स्वातंत्र्यासाठीचा मोर्चा)

फ्रान्समधील ‘‘फ्रीडम कॉन्वाय’’

पॅरिस (फ्रान्स) – फेब्रुवारी मासाच्या आरंभी कॅनडाची राजधानी ओटावा येथे कोरोना लसीकरणासंबंधी निर्बंधांना विरोध करण्यासाठी ज्या प्रकारे सहस्रावधी ट्रकचालकांनी आंदोलन केले होते, ते लोण आता फ्रान्समध्येही पसरत आहे. देशभरातून सहस्रावधी ट्रकचालक आणि अन्य लोक आपापल्या वाहनांनी राजधानी पॅरिसच्या दिशेने आगेकूच करत आहेत. यामध्ये सर्व विचारसरणींचे लोक आहेत. हॉटेल, दारूची दुकाने आणि अन्य सार्वजनिक स्थळे या ठिकाणी येण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र अनिवार्य केल्याच्या विरोधात हे आंदोलन केले जात आहे. कॅनडाच्या धर्तीवर या आंदोलनालाही ‘फ्रीडम कॉन्वाय’ असे नाव देण्यात आले आहे.

१. विरोधी पक्षनेत्या मरीन ली पेन यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याने यास राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

२. अवघ्या दोन मासांत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असल्याने या आंदोलनावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

३. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सर्वांना शांतता राखण्याची चेतावणी दिली आहे.

४. दरम्यान ‘बीबीसी’ने दिलेल्या माहितीनुसार ऑन्टेरियो प्रांतात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

५. ‘ग्लोबल न्यूज’ या कॅनडाच्या वृत्तवाहिनीने सांगितले की, कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाने आंदोलक असलेल्या ट्रकचालकांना मिळत असलेल्या निधीचे सर्व स्रोत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.