जी.ए. सॉफ्टवेअरचे संचालक अश्विनकुमार यांनी सुपेंना ३० लाख रुपये दिल्याचे उघड

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रकरण

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अपव्यवहार प्रकरणामध्ये महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना वर्ष २०१८ मध्ये ‘टीईटी’ची परीक्षा घेणार्‍या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. या आस्थापनाचे संचालक अश्विनकुमार शिवकुमार यांनी ३० लाख रुपये दिल्याचे पोलीस तपासामध्ये मान्य केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुपे यांनी जळगावचे शिक्षणाधिकारी यांच्याकडून ८१ बनावट प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर कोणतीही कारवाई केली नाही. तसेच हरकळ यांच्या सूचीतील १८ परीक्षार्थींना गुणपत्रक न मिळाल्याने शिवकुमार यांनी त्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची रंगीत प्रत काढून मुंबईतील एका दलालाला दिल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या ‘रिमांड अहवाला’मध्ये नमूद आहे.