नाशिक येथील साधिका सौ. मीनाक्षी कोल्हे यांनी त्यांच्या आई अहमदाबाद (गुजरात) येथील सौ. निर्मला प्रल्हाद चौधरी यांनी भोगलेले अत्यंत खडतर बालपण, त्यांची साधना, तसेच त्यांच्यामध्ये झालेले पालट यांविषयी दिलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. आईचे अत्यंत खडतर बालपण
१ अ. बालपणी मातृ-पितृ छत्र हरपल्याने आत्याने सांभाळ करणे आणि आईचा स्वभाव भित्रा होणे : ‘आई ६ मासांची असतांना तिची आई प्लेगच्या साथीमध्ये वारली. नंतर माझ्या आजोबांनी दुसरे लग्न केले; पण पुढे १ वर्षाच्या आत आजोबांचेही निधन झाले आणि आई निराधार झाली. तिची दुसरी आई तिला सोडून निघून गेली. त्या वेळी आईच्या आत्याने आईला स्वतःच्या घरी नेऊन तिचा सांभाळ केला. आत्याचे यजमान पुष्कळ शिस्तप्रिय होते. वस्तू जागच्या जागी ठेवली नाही, तर ते आत्याला पुष्कळ रागवायचे. यामुळे आईचा स्वभाव भित्रा झाला.
१ आ. काकूने पाणचट दूध प्यायला देऊनही सोशिक स्वभावाच्या आईने त्याची वाच्यता न करणे : शाळेला सुटी लागली की, आई तिच्या काका-काकूंच्या घरी जायची. काका-काकूंचे स्वतःच्या मुलांवर प्रेम होते; पण आईशी मात्र ते दुजाभाव करायचे. मोठी काकू दुधात पाणी घालून आईला ते प्यायला देत असे. यामुळे आईला वाईट वाटायचे; पण याविषयी ती कुणाजवळही बोलत नसे.
१ इ. काकांनी आईची शेती बळकावून तिच्यावर अन्याय करूनही तिने तो निमूटपणे सोसणे : आईच्या नावावर २५ एकर शेती होती. आई अडीच वर्षांची असतांना मोठ्या काकांनी दत्तक विधान केले. आईच्या काकांनी त्यांच्या मुलालाच दत्तक देण्याचा आग्रह केला. जेणेकरून आईची सर्व संपत्ती त्या मुलाला मिळेल. या कारणामुळे दोघा भावांत वाद झाले. नंतर काकांनी आईच्या नावावर केवळ ३ एकर भूमी (जमीन) ठेवली. अन्याय होऊनही आईने त्यांच्याकडे कधी भूमी मागितली नाही कि त्याविषयी ती काही बोललीही नाही.
२. विवाहानंतरचे जीवन
२ अ. आईचा विवाह वयाच्या १४ व्या वर्षी होणे : आई १४ वर्षांची असतांना तिचा विवाह झाला आणि ती एका एकत्र कुटुंबात आली. विवाहसमयी ‘तिची पत्रिका जुळते का ?’ हे पाहिले नव्हते. लग्न झाल्यावर बाबांनी आईकडे फारसे लक्ष दिले नाही.
२ आ. बाळंतपणाच्या वेळी आजारांना तोंड द्यावे लागणे : आईच्या दुसर्या बाळंतपणात, म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेस तिला विषमज्वर (टायफाईड) झाला. आधुनिक वैद्यांनी ‘बाळाला आईचे दूध देऊ नका’, असे सांगितले. यामुळे तिच्या मनावर खोल परिणाम होऊन ती सतत ‘बाळाकडे लक्ष द्या’, असे म्हणू लागली. तिसर्या बाळंतपणाच्या वेळी ती पुष्कळ आजारी पडली.
२ इ. डोळ्यांना दिसत नसूनही स्वतःची कामे स्वतः करणे : तिच्या तीनही बाळंतपणाच्या वेळी ती आजारी पडली. तेव्हा सतत रडल्यामुळे तिच्या डोळ्यांवर ताण आला. हळूहळू तिच्या डोळ्यांना दिसेनासे झाले आणि शेवटी तिला दिसायचे बंदच झाले. गेल्या २० वर्षांपासून तिला काहीही दिसत नाही. ती भिंतीच्या आधाराने चालते. ‘स्वतःच्या अंथरुणापासून किती पावले चालून गेल्यावर स्नानगृह आणि शौचालय आहे ?, किती पावले चालून जेवायला बसायचे आहे’, हे ती लक्षात ठेवते. याप्रमाणे ती स्वतःची वैयक्तिक कामे स्वतःच करते, तसेच दिसत नसल्यामुळे ती नेहमी परेच्छेने वागते.
२ ई. आसक्ती नसणे : आईने कधीही स्वतःसाठी साडी विकत घेतली नाही. माहेरच्या नातेवाइकांकडून लग्नात मिळालेल्या साड्याच तिने वापरल्या. तिने कधी साडीसाठी हट्ट केला नाही कि दागिन्यांसाठी ती भांडली नाही. आईच्या माहेरून तिला पुष्कळ सोने मिळाले होते. बाबांनी त्यांच्या भावांच्या (काकांना) शिक्षणासाठी सोन्याचे ते दागिने मोडले; पण आईने कधीही कुरकुर केली नाही. तिला राग आल्याचे मी कधीच पाहिले नाही.
एवढे सर्व सोसूनही तिच्या मनात कधी कुणाविषयी कपट नसते, तसेच ती कुणाचा द्वेषही करत नाही.
३. अध्यात्माची आवड
३ अ. माहेरी महानुभाव पंथानुसार साधना करणे : लहानपणापासून तिने अनुभवलेली परिस्थिती आणि मागच्या जन्मांची पुण्याई यांमुळे आईला अध्यात्माची पुष्कळ आवड लागली. आईच्या माहेरी महानुभाव पंथानुसार साधना करतात. त्यानुसार श्रीकृष्ण आणि दत्त यांची उपासना केली जाते. आई लहानपणापासूनच ‘श्रीकृष्णाला उठवणे, त्याला दुधाचा नैवेद्य दाखवणे, झोपवणे’, आदी उपासना करत होती. तिने आमच्यावरही तसे संस्कार केले.
३ आ. गीतेतील अनेक अध्याय तोंडपाठ करणे : ती प्रतिदिन गीतेचा १५ वा अध्याय म्हणत असल्याने आम्हालाही तो मुखोद्गत झाला. ती आम्हाला नेहमी गीतेतील वचने सांगत असे. तिला गीतेतील अनेक अध्याय तोंडपाठ आहेत. ती कुणाला तरी ‘तू श्लोक म्हण. मी तुझ्या पाठीमागे म्हणते’, असे सांगते. असे करत करत तिने सर्व श्लोक पाठ करून अनेक अध्याय पाठ केले आहेत. ही श्रीकृष्णाची तिच्यावर असलेली कृपाच आहे.
३ इ. देवतांचे स्मरण करणे आणि दिवसभर नामस्मरण करणे : पूर्वी आईने तिच्या आजीसमवेत जाऊन सर्व तीर्थयात्रा केल्या आहेत. आता तिला दिसत नसल्यामुळे ‘‘तू नामजप करतेस का ? तुला काय काय दिसते ?’’ असे विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘मी ज्या ज्या ठिकाणी तीर्थयात्रा करून आले आहे, तेथील देवतांचे स्मरण करते आणि त्यांच्या चरणी नमस्कार करते.’’ ती दिवसभर हातात जपमाळ घेऊन नामस्मरण करते.
३ ई. प्रतिदिन प्रार्थना करणे : मी सनातन संस्थेच्या संपर्कात आले. तेव्हा तिला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत भक्तराज महाराज यांना उद्देशून काही प्रार्थना लिहून दिल्या अन् ‘‘दिवसातून २ – ३ वेळा या प्रार्थना कर’’, असे सांगितले. आईने त्या प्रार्थना तोंडपाठ केल्या. ती प्रतिदिन १० – १२ वेळा त्या प्रार्थना करते.
३ उ. मुलीला साधनेत साहाय्य करणे : मी सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवा करायला आरंभ केला. त्या वेळी यजमानांचा मला विरोध होत होता; पण आई माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. ती माझ्या यजमानांना साधनेविषयी समजावून सांगायची.
४. आईमध्ये जाणवत असलेले पालट
अ. आईच्या त्वचेत पालट झाला आहे.
आ. आईमध्ये पुष्कळ सात्त्विकता जाणवत आहे.
इ. ती नेहमी आनंदी असते. ती एखाद्या गोष्टीवर खळखळून आणि निरागसपणे हसते. तिच्याकडे पाहून चांगले वाटते आणि आनंद जाणवतो.
देवा, तू आमच्यावर सतत कृपा करतोस; पण आम्हीच सर्व घ्यायला न्यून पडतो. ‘गुरुमाऊली, आमची ईश्वरप्राप्तीची तळमळ वाढू दे’, अशी तुझ्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
-सौ. मीनाक्षी कोल्हे, नाशिक (९. २. २०१८)