वर्ष २०१८ ते २०२० या कालावधीत देशात २५ सहस्रांहून अधिक नागरिकांनी आत्महत्या केल्या ! – केंद्र सरकार

आत्महत्येमागे बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणा ही दोन मुख्य कारणे

  • स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला मूलभूत गोष्टी न पुरवल्यामुळेच लोकांना आत्महत्या करावी लागत आहे, हे शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांना जीवनाचा मूळ उद्देश कळत नाही, तसेच ते साधना करत नसल्याने ‘परिस्थितीकडे कसे पहावे ? आणि ईश्‍वरावर श्रद्धा ठेवून कसे वागावे’, हेही त्यांना कळत नाही अन् ते आत्महत्येकडे वळगतात ! हिंदूंना सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना शिकवली असती, तर ही स्थिती आली नसती ! – संपादक

नवी देहली – देशात वर्ष २०१८ ते २०२० या ३ वर्षांत बेरोजगारीमुळे ९ सहस्र १४० तर, कर्जबाजारीपणामुळे १६ सहस्र ९१, अशा एकूण २५ सहस्र २३१ लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत लेखी प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी ही माहिती दिली.

१. बेरोजगारीमुळे आत्महत्यांचे प्रमाण हळूहळू वाढत गेले असून कोरोनाच्या काळात वर्ष २०२० मध्ये ते सर्वाधिक, म्हणजे ३ सहस्र ५४८ इतके होते. वर्ष २०१८ मध्ये २ सहस्र  ७४१ जणांनी, तर २०१९ मध्ये २ सहस्र ८५१ जणांनी आत्महत्या केली.

२. कर्जबाजारीपणा किंवा दिवाळखोरी यांमुळे वर्ष २०१८ मध्ये ४ सहस्र ९७०, वर्ष २०१९ मध्ये ५ सहस्र ९०८ जणांनी आत्महत्या केली. वर्ष २०२० मध्ये ही संख्या ६०० ने अल्प झाली. या काळात ५ सहस्र २१३ जणांनी मृत्यूला कवटाळले.

३. नित्यानंद राय म्हणाले की, केंद्र सरकार ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ राबवत असून त्याद्वारे देशातील ६९२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाला साह्य करत आहे. मानसिक आरोग्य सुधारणा कार्यक्रम आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून आत्महत्या रोखण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.