|
संभाजीनगर – काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने किराणा मालाच्या दुकानात वाईनची विक्री करण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी महिलांचे मत जाणून घेण्यासाठी एका दैनिकाने केलेल्या सर्वेक्षणात ८८ टक्के महिलांनी ‘किराणा दुकानात किंवा ‘सुपर शॉपी’मध्ये (मोठ्या विक्री केंद्रांमध्ये) वाईनच्या विक्रीला अनुमती दिली, तर मुलांवर याचा दुष्परिणाम होईल. त्यामुळे राज्य सरकारने वाईन विक्रीचा निर्णय रहित करावा’, असे मत व्यक्त केले आहे. किराणा दुकानात आईसमवेत बहुतांश वेळा मुले असतात. वस्तू विकत घेतांना त्यांची याविषयीची उत्सुकता वाढून ते याच्या आहारी जाऊ शकतात, अशी चिंताही या निरीक्षणात महिलांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे राज्य सरकारने त्वरित वाईन विक्रीचा हा निर्णय पालटावा, असे मत महिलांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय त्वरित पालटावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणीही महिलांनी दिली आहे. ज्या दुकानात वाईनची विक्री केली जाईल, तेथे किराणा माल घ्यायला जाणार नाही, असेही महिलांकडून सांगण्यात येत आहे.