बर्फामध्ये अडकलेल्या ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’च्या सैनिकांना वाचवतांना सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे यांना आलेले अनुभव !

सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे

‘७ मराठा लाईट इन्फंट्री’ने काश्मीरमधील चोव्किबल आणि तंगधार येथे २ वर्षे देशाची सुरक्षा करण्याचे काम केले. त्यानंतर ही पलटन (सैन्याची एक तुकडी) पुण्याला येऊन परत कारगिल येथे गेली होती. तेथे अतीउंचीवर त्यांनी २ वर्षे काम केले. तेथे कार्यरत असतांना ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चे काही सैनिक बर्फामध्ये गाडले गेले होते. त्यांना ७ मराठाचे सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे आणि त्यांचे सहकारी यांनी सुखरूप बाहेर काढले, तसेच वैद्यकीय उपचार मिळवून दिले. यात एकाचा मृत्यू झाला, तर एकाचा पाय कापावा लागला. ही घटना सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे यांच्याच शब्दांमध्ये पहाणार आहोत. या लेखावरून अतीथंड कारगिलमध्ये सैनिकाची तैनात होणे, हे किती कठीण असते, याची आपल्याला कल्पना येईल. (‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चे सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे यांना ‘ऑनररी’ (मानद) कॅप्टनचा हुद्दा मिळाला होता. तंगधारमधील कामगिरीसाठी त्यांना सेना पदक देऊन गौरवण्यात आले होते.)

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. तंगधारकडे जातांना बटालियन कमांडरच्या आदेशानुसार काही सैनिकांना समवेत घेऊन जाणे आणि अचानक जोराचा वारा सुटणे

मी चोव्किबलमध्ये असतांना चार्ली आस्थापनामध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर होतो. त्या वेळी माझ्या आस्थापनामध्ये बी.आर्.आर्. पुंजा हे आस्थापनाचे कमांडर होते. चोव्किबल येथून तंगधारकडे जातांना मार्गामध्ये आमची चौकी लागायची. त्यामुळे पुढे जाणारे सैनिक काही काळ या चौकीवर थांबायचे. आम्ही चोव्किबल येथून तंगधार येथे रात्रीच्या वेळी जायचो; कारण दिवसा गेल्यास ‘स्लायडिंग’ (भूस्सखलन) होण्याचा अधिक धोका असायचा. स्लायडिंग झाल्याने यापूर्वी काही दुर्घटनाही घडल्या होत्या. त्यात अडकलेल्या सैनिकांचे मृतदेह मिळण्यास १-२ वर्षे लागली होती. ११ जानेवारी १९७७ च्या रात्री ‘चौकीवर काही लोक ठेवून इतरांना तुमच्यासमवेत घेऊन जावे’, असा आदेश बटालियन कमांडरने मला दिला. त्याप्रमाणे मी तेथे काही सैनिक सोडून ४ ‘क्वार्टर गार्ड’ आणि १६ सैनिक यांना घेऊन गस्तीवर निघालो. प्रत्येक सैनिकाच्या मध्ये १० ते १५ फूट अंतर ठेवले होते. आम्ही आमच्या चौकीपासून जेमतेम १ किलोमीटर अंतरावर पोचलो होतो. अचानक जोराचा वारा सुटला.

२. हवेचा जोर अधिक असल्याने सर्व सैनिक १ सहस्र ६०० मीटर खड्ड्यात पडणे आणि अशा बिकट स्थितीत पुढचे काहीही न दिसणे

पहिल्या दिवशी आम्ही बर्फावर खुणा करून ठेवल्या होत्या; पण त्या खुणा हवेमुळे पुसल्या गेल्या. त्यामुळे आम्हाला रस्ता सापडलाच नाही. आम्ही तसेच पुढे जात राहिलो. पहाडावर हवेचा जोर पुष्कळ होता. सैन्याच्या ४ तुकड्या पुढे निघून गेल्या होत्या. आम्ही जेथे पाय रोवले होते, तेथे एकदम हवा शिरली, ‘कट्’ असा आवाज आला आणि आम्ही सर्व जण भूमीवर पडलो. त्यातील काही जण नाल्यात फेकले गेले. आम्ही १ सहस्र ५०० ते १ सहस्र ६०० मीटर खड्ड्यात पडलो होतो. ‘त्यातून आम्ही बाहेर पडू’, असे कुणालाही वाटले नव्हते; पण आमच्या पाठीशी परमेश्वर होता. मी स्वत: भूमीवर पडल्यानंतर पोटावर घसरत गेलो आणि पाय दुमडून बसलो. दोन्ही हात गुडघ्यांवर होते. माझ्या डोक्यावरून बर्फ पडत होता. त्यामुळे मला तोंड उघडता येत नव्हते आणि पुढचे काही दिसतही नव्हते.

(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)

३. श्रीरामाचा नामजप केल्यावर खड्ड्यातून बाहेर पडता येणे आणि घायाळ सैनिकांना साहाय्य करून धीर देणे

मी खड्ड्यामध्ये असतांना मनातल्या मनात केवळ ‘राम’, ‘राम’, ‘राम’ म्हणत होतो. तेवढ्यात मला परमेश्वराने साहाय्य केले आणि मी अचानक उसळी मारून बाहेर पडलो. माझ्यासमवेत आलेला मनुनकर नावाचा सशस्त्र सैनिक माझ्यापासून ५-६ फुटांवर आडवा पडला होता. तो मला दिसलेला पहिला घायाळ सैनिक होता. मी त्याला हातरूमालाने पुसले आणि धीर दिला. तो म्हणाला, ‘‘तुम्ही एकटे काय करणार ? सर्व लोक खाली गेले आहेत.’’ मी त्याला म्हणालो, ‘‘मला करता येईल, तेवढे प्रयत्न करतो, घाबरू नको.’’ मी त्याला खोटे सांगितले, ‘‘मी हेलिकॉप्टरसाठी मुख्यालयाकडे संदेश पाठवला आहे.’’ तेवढ्यात एका हेलिकॉप्टरने ब्रिगेडच्या मुख्यालयावरून उड्डाण केले; पण ते ३ चकरा मारून श्रीनगरच्या बाजूने निघून गेले. मी त्याला समजावले, ‘‘तेथे झाडी होती, सगळीकडे बर्फ पडला होता आणि हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा नव्हती; म्हणून ते परत गेले.’’ मी माझ्या हातातील लेदरचे हातमोजे त्याच्या हातात घातले आणि त्याला धीर दिला.

त्यानंतर मी खोल खड्ड्यात पडलेल्या सैनिकांकडे जाऊ लागलो. तेव्हा मला चालता किंवा उतरताही येत नव्हते. मी घसरत खाली गेलो. माझ्याकडे सर्व ‘स्पोर्टमॅन’ (खेळाडू) होते. मला भूमीच्या खालून एका सैनिकाचे केवळ नखाएवढे बोट वर दिसत होते. त्याला मी हाताने उकरून काढले. तेवढ्यात दुसर्‍या सैनिकाचा आवाज आला. मी भूमीला कान लावला असता एक जण कण्हत असल्याचे जाणवले. मग मी त्यालाही बाहेर काढले. त्याच्या डोक्याला मार लागला होता. दोघांना बाहेर काढता आल्याने मला थोडे बरे वाटले. एक सैनिक झाडीत अडकला होता. त्याला मी साहाय्यासाठी बोलावले. दुसरा सैनिकही झाडावर अडकला होता. बर्फाची उंच लाट येऊन ती झाडाच्या पातळीपर्यंत गेली होती. त्यामुळे तो झाडावर फेकला गेला; पण तो झाडाला पकडून त्यावर बसला होता.

४. १२ सैनिकांना वाचवून त्यांना साहाय्य करण्यासाठी गाव किंवा घर शोधण्याचा प्रयत्न करणे

या दुर्घटनेमध्ये कुणाचा पाय तुटला होता, तर कुणाचा हात तुटला होता. त्यामुळे काहींना दोरीने, तर काहींना मांडीवर बसवून मी वाचवले. एका सैनिकाचा एक पाय कामच करत नव्हता. मी त्याचा पाय मांडीवर घेतला आणि घसरत घसरत त्याला १ किलोमीटरपर्यंत घेऊन गेलो. केवळ एकच नाही, तर अशा अनुमाने १२ जणांना मी खाली घेऊन गेलो. आमच्या हातात काहीच नव्हते. यामुळे ब्रिगेड मुख्यालयाला माहिती द्यायची आणि त्यांचे साहाय्य घ्यायचे ठरवले. शेवटी २ सैनिक कमी भरत होते. त्यातील एक जण झाडावर होता आणि एकाचा पत्ता लागत नव्हता. मी दोन सैनिकांना खाली पाठवून पुढे कुणी स्थानिक नागरिक मिळतात का ? ते पहायला सांगितले. त्या सैनिकांना जाऊन २ घंटे झाले; पण ते परत आलेच नाहीत. त्यामुळे ‘मी स्वत: एखादे गाव किंवा घर मिळेल’, या आशेने खाली गेलो.

५. एका वयस्कर व्यक्तीने साहाय्य करणे

मला २ झोपड्या दिसल्या. तेथे दोन माणसे भेटली. त्यांच्यापैकी एक वयस्कर व्यक्ती हिंदी चांगल्या प्रकारे बोलत होती. त्याने मला घरात घेतले. मी त्याला आमची सर्व स्थिती सांगितली. त्याने स्वत: २-३ माणसे सिद्ध करून त्यांना आमच्या २ शिपायांसमवेत वाट दाखवण्यासाठी पाठवले. ३ घंट्यांनी ते बटालियनच्या मुख्यालयापर्यंत पोचले. तेथे त्यांनी बटालियनच्या कमांडरला सर्व सांगितले.

६. एका सैनिकाच्या पायाच्या नसा तुटल्याने त्यातून दुर्गंध येणे आणि तो पाय कापून तेथे कृत्रिम पाय बसवण्यात येणे

या घटनेमध्ये सर्व १६ जण घायाळ झाले होते; पण माझा एक सैनिक मृत झाला; कारण तो ३ फूट बर्फामध्ये गाडला गेला होता. तो मला सापडला नाही. दुसर्‍या दिवशी शोधमोहीम करणार्‍या चमूला तो सापडला. घटनेची माहिती समजल्यावर २०० ते २५० लोकांचे साहाय्य पाठवण्यात आले. त्यांनी सर्व घायाळ सैनिकांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात पोचवले. एक बॅरेक (कक्ष) खाली करून तेथे ‘७ मराठा’चे सर्व सैनिक उपचारांसाठी ठेवले होते. त्यांच्यापैकी एका सैनिकाचा पाय काढावा लागला. ‘त्याला काही सांगू नका’, अशी मला चेतावणी दिली होती. त्याच्या पायाच्या नसा तुटलेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या पायातून दुर्गंध येत होता. त्यामुळे तो पाय कापून तेथे कृत्रिम पाय लावण्यात आला.

७. सैनिकाला त्याच्या पायाच्या स्थितीविषयी प्रेमाने आणि शांतपणे समजावून सांगणे अन् कालांतराने त्याच्यावरील चांगल्या उपचारांमुळे तो सायकल चालवू लागणे

दुसर्‍या दिवशी सकाळी कमांडर साहेब येऊन मला म्हणाले, ‘‘साहेब, त्या सैनिकाचा पाय रात्रीच कापला. हे समजल्यावर त्याला वाईट वाटेल. तो आमचे ऐकणार नाही; पण तुमची भाषा ऐकेल. त्यामुळे तुम्ही जाऊन त्याला सांगा.’’ मी त्या सैनिकाला भेटून म्हणालो, ‘‘बाळ, घाबरू नको. कसा आहेस ?’’ तो म्हणाला, ‘‘मी ठीक आहे; पण साहेब, माझा पाय जरा जड वाटत आहे. हा पाय माझा कसा काय ?’’ मी म्हणालो, ‘‘हे बघ, तुझा पाय नासला होता. त्याच्या नसाही पूर्ण तुटल्या होत्या. तो तसाच ठेवला असता, तर तुझ्या संपूर्ण शरिरात विष झाले असते. त्यामुळे तुझा जीव वाचवण्यासाठी पाय काढावा लागला. हे मला रात्रीच ठाऊक होते.’’ तो म्हणाला, ‘‘ठीक आहे साहेब.’’ त्यानंतर तो चांगला झाला. त्याने अनेक वर्षे सेंट्रलमध्ये (पुस्तके वाचण्यासाठी मिळतात त्या ठिकाणी) नोकरी केली. पुढे त्याला अधिक चांगले उपचार देण्यात आले. त्यानंतर तो सायकल चालवू लागला.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन